राज्य शिक्षण मंडळाच्या पोर्टलवर गुण पाठविण्याची व्यवस्था, २ जुलैनंतरच कळेल - किती टक्के शाळांनी पूर्ण केला टप्पा?
अमरावती : यंदा दहावीच्या परीक्षा न घेता थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे गुणदान करावे, याचे निकष, नियमावली ठरली आहे. त्याकरिता राज्य शिक्षण मंडळाने प्रत्येक शाळेला पोर्टलवर लिंकद्वारे गुण पाठविण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, काही शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण पाठविले नाहीत. असे असले तरी २ जुलैनंतरच किती शाळांनी ऑनलाईन गुण पाठविले वा नाही, हे स्पष्ट होईल. तथापि, दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार असतील, हे वास्तव आहे.
कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. परीक्षाविनाच विद्यार्थ्यांची ‘ढकलगाडी’ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परंतु, शासननिर्देशांनुसार राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यासाठी शाळांना ऑनलाईन गुण पाठविण्याचे कळविले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात ६५ टक्के शाळांनी पोर्टलवर गुणदान पाठविण्याचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती आहे.
---------------------
६५ टक्के शाळांनीच टप्पा पूर्ण केला
---------
- जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी : ४०६६३
मुले : २७३३५
मुली : २३३२८
------------------
दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण शाळांना थेट ऑनलाईन पाठवावे लागतात. त्यामुळे तूर्त किती शाळांनी गुणदान केले, हे सध्या सांगता येणार नाही. मात्र, राज्य शिक्षण मंडळाकडून शाळांना गुण पोर्टलवर पाठविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता २ जुलैपर्यंत कालावधी ठरविण्यात आला आहे.
- तेजराव काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अमरावती.
-------------------
गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी
ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कागदापत्रे मिळण्यास उशीर लागत आहे. काही वेळा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान बोर्डाकडे पाठविले जाईल.
- एन.एम. तायडे
--------------------
आतापर्यंत ६५ टक्क्यांवर विद्यार्थ्यांच्या गुणदानाची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. पुढील तीन दिवसांत ती वेगाने करण्यात येणार आहे. पोर्टलवर गुणदान करताना फारशी अडचण येत नाही. मात्र, अन्य शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांबाबत समस्या उद्भवत आहे.
- सुरेश मोलके
----------------
१) दहावीची परीक्षा न होता थेट गुणदान मिळून पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांचे फावले आहे.
२) वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेऊन दहावीच्या परीक्षांची तयारी चालविली. मात्र, परीक्षा न घेता निकाल लागणार असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
३) दहावीची परीक्षा झाली नाही. आता अकरावी प्रवेशासाठी सीईटीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात येणार असल्याने आतापासूनच विद्यार्थी तयारीला लागले आहेत.