अवघ्या १५ शाळेतील विद्यार्थी उघड्यावर नवीन बांधकामाचा प्रस्ताव
अमरावती : शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधले. त्यामुळे उघड्यावर विधी उरकरण्याच्या प्रकाराला आळा बसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. अलीकडेच फक्त १५ शाळांमध्ये नव्याने स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव दाखल झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहाची व्यवस्था असावी असा उपक्रम राज्य सरकारने हाती घेऊन त्यासाठी प्रत्येक शाळेसाठी निधीची तरतूद करण्याचे आदेश आहेत. काही वर्षात सर्व शिक्षा अभियान, जिल्हा निधी व डीपीसीच्या निधीतून शाळाखोल्या बांधकामासह विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा मोठा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यातून अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली. त्यातही मुलांसाठी व मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृहे बांधल्याने मोठी सोय थांबली आहे. ग्रामीण भागात मधल्या सुट्टीत विद्यार्थी शाळेबाहेरच विधीसाठी जात असल्याने त्यातून रोगराई व अस्वच्छता दुर्गंधीचा परिणाम होतो. शिक्षण विभाग व आरोग्य विभागाने संयुक्तपणे शाळांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केल्याने प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह उभारण्यास प्राधान्य देण्यात आले. अशातच ज्या शाळा वर्गखोली बांधकाम, स्वच्छता, दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी दिला आहे. यासोबतच मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्याकरिता प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे २ कोटीच्या निधीची विशेष बाब म्हणून शासनाकडे मागणी केली आहे.
बॉक्स
१५ शाळांमध्ये नाही स्वच्छतागृहे
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १५ प्राथमिक शाळेत स्वच्छता गृहे नसल्याची बाब अलीकडेच निदर्शनास आली आहे. जिल्ह्यात १५८३ प्राथमिक शाळा आहेत. यापैकी १५६८ शाळांच्या आवारात स्वच्छतागृहे उभारण्यात आले आहेत. १५ ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध नाही. तसेच ४३ ठिकणच्या स्वच्छतागृह नादुरूस्त आहे.
कोट
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या काही शाळा खूप जुन्या आहेत त्या वेळी स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था केली नसली तरी काळानुरूप आता प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत. त्यात मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.याकरीता गतवर्षी २२ कोटीहून अधिक रूपयाचा निधी दिला आहे. आता पुन्हा काही शाळांमध्ये नवीन व नादुरूस्त स्वच्छतागृहासाठी विशेष बाब म्हणून २ कोटी रूपयाचा निधी मागितला आहे.
- बबलू देशमुख,
अध्यक्ष, जिल्हा परिषद
बॉक्स
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा १५८३
दुरवस्था झालेली स्वच्छतागृहे २३
शाळांमध्ये नाही स्वच्छतागृहे १५
दुरुस्तीसाठी आवश्यक निधी २ कोटी
बॉक्स
तालुका शाळांची संख्या स्वच्छतागृह नसलेल्या शाळांची संख्या
अचलपूर १२९ ०३
चांदूर बाजार १२२ ०१
भातकुली ११० ०३
चिखलदरा १६५ ०३
धारणी १७० ०४
नांदगाव खंडे. १२४ ०१