फोटो पी ३० मोशीर्
मोर्शी : कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावले असून अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. मागील सत्रापासून शाळा बंद पडल्याने स्कूल व्हॅनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील एका व्हॅनचालकाने लॉकडाऊन शिथिल होताच भाजीपाला विक्रीचा व्यवसाय पत्करला आहे.
जी चाके रोज चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकत शाळेच्या मार्गाने धावत होती, ती चाके आता दीड वर्षात जागची हलली नसून, व्हॅनचालकांच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. पोटाची खळगी कशी भरावी, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. वाहन खरेदीचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. अनेक स्कूल व्हॅनचालक बेरोजगार झाले आहेत. रोजगाराच्या शोधात पर्याय सापडत नसले तरी स्कूल व्हॅनसह होणाऱ्या व्यवसायात रुची दाखवत असून, एकाने भाजीपाला विक्रीला पसंती दिली आहे. शहरातील ज्या मार्गावर फिरून शाळेत विद्यार्थी गोळा करीत उपजीविका साधली, त्याच रस्त्यावर उतरून भाजीपाला विकण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे. अनेकांना वेगळे पर्याय नसल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. या घटकालाही शासकीय मदत मिळणे आवश्यक आहे.