संख्या पोहोचली पाचवर, प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत,
मोर्शी : अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत मोर्शी शहरातील चार व तालुक्यातील बेलोना येथील एका शाळकरी मुलाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे. तरीसुद्धा प्रशासनामार्फत या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्या जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.
सूत्रांनुसार, अप्पर वर्धा कॉलनी येथील अप्पर वर्धाच्या कॉर्टरमध्ये भाड्याने राहत असलेल्या विजय श्रीराव यांचा ओम या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा ५ सप्टेंबर रोजी डेंग्यूसदृश आजाराने बळी घेतला. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. ५ ते ३० वर्षे वयोगटातील मुले-युवकांना ताप येऊन शरीरातील पेशी कमी होत आहेत. परिणामी शहरातील मोठ्या दवाखान्यांमध्ये दाखल होण्यासाठी गर्दी वाढली आहे. हा आजार आणखी किती बळी घेणार, अशी भीती मोर्शी शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये पसरली आहे. शहरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने डासांचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता तरी मोर्शी शहरात दिवसाआड फवारणी व काही दिवसांआड नाली सफाई करण्यात यावी, गाजरगवत निर्मूलन मोहीम राबविण्यात यावी, डासांचा प्रादुर्भाव व डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपाय योजना कराव्यात, अशी मागणी या ठिकाणी जोर धरीत आहे.
-------------
वातावरणातील अनियमिततेने वाढविले भय
शहरातील अस्वच्छता व डासांचा उद्रेक डेंगू आजाराला कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असूनसुद्धा मोर्शी शहरात पाहिजे तसा पाऊस कोसळला नसल्याने उन्हाची दाहकता कायम आहे. पावसाच्या या अनियमितपणामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरीसुद्धा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नाल्यांची साफसफाई व फवारणी केली जात नाही.
पाच जण दगावले
१९ जुलै रोजी मोर्शी येथील रामजीबाबा परिसरातील १४ वर्षीय सर्वेश दिनेश महल्ले, ऑगस्ट महिन्यात रुक्मिणीनगरातील मयूर शैलेंद्र चौरे (२२), पेठपुरा परिसरातील गौरी प्रवीण मोथरकर (१५), तर आता ५ सप्टेंबर रोजी ओम श्रीराव या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याशिवाय बेलोना येथील सौरभ दंडाळे (२२) याचाही डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला.