लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने बंद करण्यात आलेल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ५ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजणार आहेत. कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचे संकट कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पहिली ते चाैथीपर्यंत ऑफलाईन शिक्षण बंद असणार आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी व्यवस्थापनाच्या पाचवी ते बारावीपर्यंत शाळा, पदवी व पदव्युत्तर ११८ महाविद्यालये कोरोना नियमांचे पालन करून सुरू होणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाचे आदेश निर्गमित झाले आहेत.
कोरोना नियमांचे पालन अनिवार्यकोविड व ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क,शारीरिक अंतर व गर्दी होणार नाही, याची काळजी शाळांना घ्यावी लागणार आहे. महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांतील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू होणार आहे. वर्ग खोल्या सॅनिटाईज कराव्या लागतील. जिल्ह्यात २८९७ शाळांची संख्या असून, ४४९२२६ विद्यार्थी संख्या आहे.
सार्वजनिक सुटी जाहीर, सोमवारी शाळा बंदभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१ चाअधिनियम २६) च्या कलम २५ खाली शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी शाळांना सुटी असणार आहे.
शासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसह पालकांच्या आनंदात भर घालणाराच आहे. अनेक दिवसांपासून घरात कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने मित्रांसोबत खेळण्या-बागडण्यास मिळणार असल्याने त्यांची कुपित झालेली मानसिकता बदलेल. जीवनशैलीत बदल होऊन त्याच्यातील उत्साह वाढेल.- डॉ. श्रीकांत देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ
शाळा सुरू करण्याचा निर्णय अतिशय उत्तम आहे. आता कोरोना असो वा कोणतेही संकट, शाळा बंद करणे हा उपाय नाही. विद्यार्थी अभ्यास विसरले आहेत. आता तर शिक्षक शिकवणे विसरतील, हे वास्तव आहे. त्यामुळे नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय विद्यार्थी व एकूणच शैक्षणिक क्षेत्राच्या हिताचा आहे. तो अमलात येत असल्याने आनंद होत आहे. - वैशाली परतेकी, शिक्षिका.
कोरोनाकाळात शाळा बंद करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरला. प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाबाबत अवगत केले होते. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू व्हावेत.- योगेश पखाले, शिक्षक