अग्निशमन सयंत्रे निकामी : ‘फायर सेफ्टी आॅडिट’चा बोजवारालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शाळा, महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील निम्म्यापेक्षा अधिक शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणेचा बोजवारा उडाला असून यात महापालिका, जिल्हा परिषदेत अधिकच विदारक स्थिती आहे. एखादवेळी शाळा-महाविद्यालयांमध्ये आग लागल्यास ती आटोक्यात आणणे, अशक्य व्हावे, अशी स्थिती आहे. नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा परिषद, महापालिकांसह इतर खासगी शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. महाविद्यालयांमध्ये अग्निशमन बंब बसविले असले तरी ते केवळ शोभेची वस्तू ठरले आहेत. उलटपक्षी नव्याने निर्मित शाळा-महाविद्यालयांमध्ये सुसज्ज अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. काही शाळा, महाविद्यालयांमध्ये लावलेली अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाली असताना ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी संबंधितांकडून पुढाकार घेतला जात नाही, हे वास्तव आहे. राष्ट्रीय इमारत कायद्यानुसार शाळा, महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा अनिवार्य आहे. मात्र, या कायद्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा अपवाद आहेत. सन २००८ नंतर बांधकाम झालेल्या शाळा-महाविद्यालयांच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा नसेल, तर अशा शाळा-महाविद्यालयांना अग्निशमन विभागाने नोटीस बजावून अग्निशमन यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र, आग लागल्यानंतरच प्रशासनाला जाग येते, हा आजतागायतचा अनुभव आहे. शाळा, महाविद्यालयांच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा असल्याचे प्रतिज्ञापत्र संस्थाचालक, मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांना शिक्षण विभाग, अग्निशमन विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश शाळा, महाविद्यालयांमध्ये अद्याप प्रवेश प्रक्रियाच सुरू असल्याने अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या १६०२, तर महापालिकांच्या ६६ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यापैकी बोटावर मोजण्याइतक्याच शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालयांमध्ये मात्र अग्निशमन यंत्रणा सुसज्ज असल्याचे ‘लोकमत’च्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दिसून आले.न्यायालयाचे निर्देश गुंडाळलेसन २००४ साली तामिळनाडूच्या कुंभकोणम् येथे शाळेला आग लागल्याने ९४ मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर शाळा, महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला. यासंबंधी सन २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शासकीय तसेच खासगी शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशमन साधने आणि व्यवस्थेसंदर्भात राज्य शासनाला निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सर्वच शाळा, महाविद्यालयांमध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्हाभरात अग्निशमन सुरक्षा यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.अग्निशमन सयंत्र बसविण्यात आले आहे. मात्र, अग्निशमन साहित्य यंत्राची कालमर्यादा रविवारी संपली आहे. ते पुन्हा कार्यान्वित केले जाईल. विद्यार्थी संख्येनुसार साहित्य उपलब्ध आहेत.- स्नेहल विरूळकर,मुख्याध्यापिका, आदर्श प्राथामिक शाळा
शाळा असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:03 AM