नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : मेळघाटात जिल्हा परिषद शाळांशिवाय दुसरा पर्याय नसताना आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याऐवजी शाळेतील शिक्षक विनापरवानगी गैरहजर व बेपत्ता राहत असल्याचा प्रकार पुन्हा चुरणी येथे सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीने भेट दिली असता, गुरुवारी उघडकीस आला. यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. दुसरीकडे अतिदुर्गम बोरदा, पिपल्या, टेंभ्रू येथील शाळा कुलूपबंद आहेत.
चुरणी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील शिक्षक नेहमीच बेपत्ता राहत असल्याची तक्रार असते. इयत्ता पहिली ते सातवीकरिता एकूण सात शिक्षक असून, त्यापैकी एकच शिक्षक गुरुवारी सकाळी शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी भेट दिली असता, उपस्थित होते. इतर शिक्षक कुठे गेले, याची माहिती त्या शिक्षकाला नसून विनापरवानगी गैरहजर असल्याचा प्रकार उघडकीस आला.
सरपंच नारायण चिमोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे नरेंद्र टाले, रविकुमार सेमलकर, किशोर अलोकार आदींनी यासंदर्भात चिखलदरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे. मेळघाट विविध समस्यांनी ग्रासला आहे. त्यात शिक्षणाची आबाळ होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
पिपल्या, टेंभ्रू येथील शाळा बंद होत्या. बोरदाच्या वर्गखोल्यांचे दार उघडे होते. परंतु, शिक्षक बेपत्ता असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कासदेकर यांनी भेट दिली असता, उघडकीस आला. त्यांनी जिल्हा प्रशासनाला तशी तक्रार केली आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागातील शाळा मोठ्या प्रमाणात अजूनही उघडलेल्याच नाहीत.
चुरणी येथे दोन शिक्षकांना कामानिमित्त बोलावण्यात आले होते. एका शिक्षकाचा अपघात झाला आहे, तर एक सुटीवर होता. संबंधित शिक्षकाला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. टेंभ्रू, पिपल्या, बोरदा येथील शाळा बंद असल्यासंदर्भात कुठलीच तक्रार मिळाली नाही.
- रामेश्वर माळवे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा