कुलसचिव : विद्यापीठात संशोधन पेपर लिखाणावर कार्यशाळाअमरावती : संशोधन पेपर लिहिणे, ही एक कला असून त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार दर्जेदार पध्दतीने संशोधन पेपर लिहिण्यासाठी आयोजित कार्यशाळा ही सुवर्णसंधी ठरली आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी केले.रसायनशास्त्र विभाग व नॅशनल अॅकेडेमी आॅफ सायन्सेस इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, निसाचे यू.सी. श्रीवास्तव, के.सत्यनारायणा, निरजकुमार, पी.सी. अभिलाष, रसायनशास्त्र विभाग प्रमुख आनंद अस्वार उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजय देशमुख म्हणाले, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे संशोधन पेपर लिहिण्यासाठी सैद्धांतिक विचारांसोबत भाषेची मांडणी उत्तमरितीने करता येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ही कला अवगत करणे अपेक्षित असून उत्कृष्टपणे लिहिण्यासाठी उत्कृष्ट श्रोता असणेसुध्दा महत्त्वाचे आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्यामुळे ते उत्कृष्ट संशोधन पेपर लिहितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी मार्गदर्शन करताना श्रीवास्तव म्हणाले की, कार्यशाळेत ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यातून अचुकता येऊन संशोधन पेपर लिहिण्याच्या परिपूर्णतेकडे विद्यार्थी जातील आणि त्यांची उत्कृष्ट लेखनकृती प्रकाशमय होऊन सर्वांपर्यंत पोहोचेल. अध्यक्षीय भाषण माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यांनी केले. ते म्हणाले, राईटिंग व फाईटिंग दोेन्ही गोष्टी अवघड असतात. लिखाणासाठी वैचारिक शक्ती महत्त्वाची आहे. अनेकांना पेपर लिहिण्याची सैद्धांतिक पध्दतीची माहिती असतेच असे नाही, त्यानुषंगाने कार्यशाळा महत्वाचा टप्पा ठरली आहे. यावेळी दिग्रसचे प्राचार्य आगरकर व सोनल बूब या सहभागी प्रतिनिधींनी कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत आपल्या मनोगतातून कौतुक केले. प्रास्ताविक विभाग प्रमुख आनंद अस्वार तर संचालन व आभार प्रदर्शन मनीषा कोडापे यांनी केले. कार्यशाळेला देशभरातून २०० च्या वर प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेत इतरही अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
संशोधनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन गरजेचा
By admin | Published: March 09, 2016 12:59 AM