अमरावती : कृषी विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सिमेंट बांध नाल्याच्या कामात शासकीय नियम पायदळी तुडवून नांदगाव पेठनजीकच्या जामठी नाल्यावर शासकीय पैशातून नाल्याचे खोलीकरण नियमबाह्यरीत्या करण्यात आले. मात्र याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार, शेतकरी प्रभात अग्रवाल यांनी कारवाईची मागणी करताच संबंधितांनी नाला खोलीकरण मातीने भुजविला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे केली आहे. कृषी विभागामार्फत नांदगाव पेठनजीकच्या जामठी नाल्यावर सिमेंट नाला खोलीकरण योजनेंतर्गत नाला खोलीकरणाचे काम होते. नाल्यातील दगड, माती, गाळ शेतकऱ्याची परवानगी न घेता अग्रवाल यांच्या शेतात विनापरवानगी टाकून शेतीचे मोठे नुकसान केले आहे. विशेष म्हणजे सिमेंट नाल्याचे खोलीकरण करताना नाल्यातील दगड, माती, गाळ शेतकरी आपल्या शेतात नेऊ शकतात किंवा कृषी विभाग एक किलोमीटरपर्यंत वाहतूक करू शकतो. याशिवाय खोलीकरणाचे काम झाल्यानंतर दगडाचे अस्तरीकरण करणे, नाल्याची रूंदी वाढवून दोन्ही बाजूने गवत लावणे, कामाचे तीन टप्यात छायाचित्र काढणे, विभागीय कृषी सहसंचालकांनी पाच कामे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांनी १० टक्के कामे उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी आदींनी कामाची गुणवत्ता चांगली राहील यासाठी तपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र वरील कामाची पाहणी न करता जामठी येथील कामात मोठी अनियमितता झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे नितीन हटवार, प्रभात अग्रवाल यांनी केली आहे . (प्रतिनिधी)
नाला खोलीकरणाच्या कामावर पडदा
By admin | Published: June 28, 2014 12:24 AM