अमरावती : महापालिकेत २९५ कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रकरणी चौकशीच्या अनुषंगाने सदर एजन्सीच्या कागदपत्रांची छाननी होत आहे. कर्मचारी ईएसआयसी भरल्याबाबत मूळ कागदपत्रे प्रशासनाने मागविली आहेत. तूर्त ईटकॉन्स एजन्सीचा मार्ग अडसर ठरत असल्याचे चित्र आहे.
आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘ईटकॉन्स’ एजन्सीबाबत तक्रारींचा ओघ वाढत असल्याने या निविदाप्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही उणिवा राहू नये, यासाठी सावध भूमिका घेण्यात येत आहे. ‘आऊट सोर्सिंग’चा विषय स्थायी समितीत पाठविण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचे ईएसआयसी पावत्या, एजन्सीचा मूळ रेकॉर्ड, यापूर्वीच्या कामांचा अनुभव, बँकेतील व्यवहार आदींबाबत अचूक माहिती मिळविली जात आहे. ‘ईटकॉन्स’याच एजन्सीला मनुष्यबळ पुरवठा करण्याचा कंत्राट मिळावा, यासाठी नगरविकास मंत्रालयातून सूत्रे हलविली जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र, महापालिका प्रशासन कागदोपत्री कुठेही अडचणीत येऊ नये, यासाठी आयुक्त सावध पवित्रा घेत आहेत. हल्ली ‘आऊट सोर्सिंग’चा विषय महापालिकेसाठी नाजूक दुखणे ठरत आहे. परंतु, सरतेशेवटी प्रशासन कोणती भूमिका घेते आणि स्थायी समितीकडे कसा प्रस्ताव पाठविते, याकडे नजरा लागल्या आहेत.
----------------------------
कोट
‘आऊट सोर्सिंग’विषयी अद्यापही प्रस्ताव आला नाही. यात प्रशासनाने काय भूमिका घेतली, हे मी सांगू शकत नाही. मनुष्यबळ पुरवठा करणारी एजन्सी नेमण्यासाठी प्रशासनालाच कार्यवाही करावी लागेल. त्यानंतरच स्थायी समिती निर्णय घेईल.
- सचिन रासने, सभापती, स्थायी समिती, महापालिका