फोटो - रामगावकर ०६ पी
नीलेश रामगावकर
तळेगाव दशासर : प्रत्येक गावात कुंभार समाजाचे वेगळेपण जपून ठेवलेला असा कुंभारपुरा हा असतोच. आजूबाजूच्या गावातही असे कुंभारपुरे पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने तळेगाव दशासर या गावाचा समावेश आहे. जागतिकीकरणाच्या झपाट्यातही मातीच्या मूर्तीची आपली कला आणि व्यवसाय टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मूर्तिकारांना सध्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
मागणी तसा पुरवठादेखील करू शकत नसल्याची खंत या मूर्तिकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तळेगाव येथील मूर्तिकार प्रवीण लक्ष्मणराव निळे हे त्यांच्या अनेक पिढ्यांचा वारसा जपत मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती तयार करतात. त्यांच्यासह तळेगावातील मूर्तिकार पर्यावरणाचा समतोल ढासळू नये, यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीपासून मूर्ती बनवण्याला अधिक पसंती देतात. त्यामुळे परिसरात त्यांच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एवढेच नव्हे तर गणेशमूर्तीच्या मागणीला मूर्तिकार पूर्ण करू शकत नाहीत, याची खंत त्यांनी व्यक्त केली. श्रावण महिना सुरू होण्याच्या कितीतरी आधीपासून धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील कुंभारपुऱ्यात गणेशमूर्तींची तयारी सुरू होते. विविध रूपातील गणेशमूर्ती घडवण्याच्या कामाला सर्वजण लागतात. जसजशी मूर्ती आकार घेत जाते तसतशी मूर्तिकराचे कसब त्यातून झळकू लागते.
---------
भक्तांच्या मागणीनुसार दरवर्षी गणरायाची विविध रूपे साकारण्याचे काम खूपच आव्हानात्मक असते. त्यातच वाढत्या महागाईशी गाठ पडते आणि मूर्ती घडविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी अधिक गुंतवणूक करावी लागते. त्यानुसार मूर्तीच्या किमती वाढवाव्या लागतात.
- प्रवीण निळे, मूर्तिकार.