वरूड : तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, १३ गावांत मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ती गावे हॉटस्पॉट घोषित केली. यात १३ गावांना सील करण्याचे आदेश प्राप्त होताच तालुका प्रशासनाने ती गावे गुरुवारी सायंकाळी सील केले.
केवळ गावातील जीवनावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि मेडिकल, दवाखाने, पॅथालॉजी दिवसभर सुरू ठेवता येणार आहे. बाहेरगावातील व्यक्तीला प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. शुक्रवार सकाळपासून तालुक्यातील १३ गावे सील करण्याची कारवाई आपत्ती व्यवस्थापन समितीने सुरू केली. यामध्ये शेंदूरजनाघाट, पुसला, टेंभुरखेडा, जरूड, वाठोडा, राजुराबाजार, बेनोडा, लोणी, आमनेर, सुरळी, कुरळी, ढगा, अमडापूर या गावांचा समावेश आहे. गावे सील करून ग्राम सुरक्षा दलाला कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. १३ गावे सील करण्याकरिता उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार किशोर गावंडे, गटविकास अधिकारी वासुदेव कानाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, वरूड मुख्याधिकारी रवींद्र पाटील, शेंदूरजनाघाटचे मुख्याधिकारी गजानन भोयर, वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम आणि बेनोडाचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांचे पथक कार्यरत आहे.