लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अनधिकृत करारनामे व पोट भाडेकरी ठेवल्याने जवाहर गेट व्यापारी संकुलामधील १३७ दुकाने सील करून ताब्यात घेण्यात आले. ही धडाकेबाज कारवाई गुरुवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली. १०० पेक्षा अधिक दुकानांना एकाच वेळी सील लावण्याची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई आहे. बुधवारी महापालिकेने जयस्तंभ चौकातील प्रियदर्शिनी संकुलातील तब्बल ५४ दुकाने सील करून आता कुणालाही भीक घातली जाणार नाही, असा इशारा दिला होता. यावेळी तेथील व्यापाऱ्यांनी पथकावर हल्ला चढविण्याचा प्रयत्नसुद्धा केला. मात्र अडचणीवर मात करून ही कारवाई यशस्वी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी बाजार परवाना विभागाचे पथक सकाळीच जवाहर गेट संकुलात शिरले. तेथील तब्बल १३७ दुकानांना सील करण्यात आले. ही कारवाई सुरू असताना या संकुलातील शेकडो दुकानदारांनी आयुक्त कार्यालयात धाव घेतली. मात्र जुनी थकबाकी भरल्याशिवाय सील तोडले जाणार नाही आणि अनधिकृत करारनामे रद्द करण्यात येऊन नव्याने करारनाम्याची प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी त्यांना दिली. पवार यांच्यावर यावेळी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. बड्या राजकीय नेत्यांकडून आयुक्तांकडे या कारवाईबाबत विचारणाही करण्यात आली. मात्र वस्तुस्थिती सांगितल्यानंतर संबंधित राजकीय नेतेही बॅकफुटवर आलेत. या संकुलामधील अनेक करारनामे अनधिकृत असून १०० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी स्वत:ऐवजी दुसऱ्यांनाच ही दुकाने पोटभाडेकरी म्हणून दिली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी इतवारा बाजार येथील दुकाने व ओटे सील करण्यात येणार आहे. दुकानदारांनी त्वरित थकीत भाडे व करारनामे करून घ्यावे व जप्तीची कार्यवाही टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. ही कारवाई उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनामध्ये बाजार परवाना विभागाचे बाजार परवाना अधीक्षक निवेदिता घार्गे, निरीक्षक केशव ठाकरे, आनंद काशीकर, अभियंता संकेत वाघ, स्वप्निल महल्ले, अमर सिरवानी, हरिराम शेलुकर, मनोज इटनकर, रोशन पुसतकर यांनी कार्यवाही केली.
जवाहरगेट व्यापारी संकुलामधील १३७ दुकाने सील
By admin | Published: May 19, 2017 12:35 AM