फोटो - धारणी २० एस
आगाऊ ताबा देण्याबाबतचे आदेश धडकले, नगरपंचायतला जिल्हाधिकाऱ्यांची मकर संक्रांती भेट श्यामकांत पाण्डेय
धारणी : मेळघाटातील आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या धारणी शहरातील बहुचर्चित सर्व्हे नंबर १२६, गुजरी बाजार येथील अतिक्रमणाचा मुद्दा आता कायमचा संपुष्टात येणार आहे. नगरपंचायतद्वारे मागणी केल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी रोजी आदेश पारित करून सर्व्हे नंबर १२६ पैकी ९५ आर जागा ग्रामपंचायतीला देण्याचे आदेश पारित केले. आगाऊ ताबा देण्याबद्दलचे पत्र नगरपंचायतीला प्राप्त झाले आहे.
शासन व प्रशासनाच्या निर्णयात सर्व्हे नंबर १२६ चा मुद्दा अनेक वर्षे अडकलेला होता. अखेर नगरपंचायतला भोगवटदार वर्ग-२ म्हणून मालकी मिळाल्यामुळे आता या भूखंडाचा कायापालट होण्याचे मार्ग मोकळे झाले आहे. येथे ठिय्या मांडलेले अतिक्रमिक व नगरपंचायत यांच्यात जागेच्या वादावरुन नेहमी खटके उडत होते व प्रकरण वारंवार न्यायालयात जात होते. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम अर्ध्यावर नेऊन मागे घेतली जात होती. मात्र, आता नगरपंचायतीला ही जागा मिळाल्यामुळे आता सर्व अधिकार नगरपंचायतकडे संरक्षित झाले आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.
सर्व्हे नंबर १२६ ही संपूर्ण जागा १ हेक्टर २१ आर आहे. यापैकी नऊ गुंठ्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे बसस्थानक असून, १७ गुंठे जागांचे पट्टे वितरित करण्यात आले असल्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे उर्वरित ९५ आर दादा शासकीय दराप्रमाणे जवळपास ३८ लाख रुपये भरून नगरपंचायतला हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चालान भरून जागेचा आगाऊ ताबा मोजमाप करून नगरपंचायतला देण्याचे तहसीलदारांना आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे आता नगरपंचायतीचे विकासाचे स्वप्न पूर्ण होणार असून, सर्व्हे नंबर १२६ मध्ये बाजारपेठेची निर्मिती करून नगरपंचायतीच्या आर्थिक उन्नतीमध्ये हातभार लावण्यात हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.