: आता थेट फौजदारी कारवाई
फोटो पी ०९ धामणगाव
धामणगाव रेल्वे : शहर व तालुक्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रविवारपासून सुरू झालेल्या कडक निर्बंधात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी एकाच दिवशी दहा दुकाने मुख्याधिकारी यांनी रस्त्यावर उतरून सील केली आहे.
धामणगाव शहरात ४० ते ५० वयोगटातील कोरोनामुळे मृत्यूची संख्या अधिक वाढली आहे. वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यात आठ दिवस सुरू राहणाऱ्या कडक निर्बंधासंदर्भात आमदार प्रताप अडसड यांनी रविवारी सर्व प्रशासकीय यंत्रणेची ऑनलाइन बैठक घेतली. यावेळी तहसीलदार गौरवकुमार भळगाठींया, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे या उपस्थित होत्या. धामणगाव शहरात दुपारी १२ नंतर सुरू असलेल्या दहा दुकानांवर मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी कारवाई करत ही दुकाने सील केली. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, कर्मचारी राजेंद्र भोंगे, प्रकल्प अधिकारी किशोर बागवान प्रमोद खराटे, पांडे, डगवार, सईद पठाण खान, कापसे, हारून, यादव, नकवे, कोकाटे, उईके व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
नगरपरिषद प्रशासन व पोलीस विभाग आठ दिवस सतर्क राहणार असून, या कालावधीत अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरूद्ध थेट फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांनी सांगितले.