वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यासाठी राजकीय पक्षाआड पॅनलप्रमुखांनी उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक अविरोध करण्यासाठी आ. देवेंद्र भुयार यांचे प्रयत्न सुरू असून, त्यांनी त्यासाठी २५ लाखांचा प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली आहे.
तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमधील ४५ हजार २४२ पुरुष व ४१ हजार ८२१ स्त्री असे ८७ हजार ६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. ४१ ग्रामपंचायतींकरिता ११ आरओ आणि एआरओंची नेमणूक करण्यात आली. १३९ प्रभागाकरिता ही निवडणूक घेतली जाणार आहे, तर १५५ केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल.
वरूड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी युती, तर काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याची चर्चा आहे. भाजपसुद्धा स्वतंत्र निवडणूक लढवून गड काबीज करण्याच्या तयारीला लागली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक अविरोध करण्यावर आ. देवेंद्र भुयार यांचे प्रयत्न सुरू असून, २५ लाखांचा प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, चढाओढीमध्ये सिकंदर कोण राहणार, हा राजकीय चर्चेचा विषय आहे.
-----------------------------