खंडणी प्रकरण : आसिफ, अफजलला जामीनअमरावती : खंडणीची मागणी करणाऱ्या शेख जफरच्या शोधात शहर कोतवाली पोलिसांचे पथक रविवारी अकोला रवाना झाले. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या शेख सैयद आसिफ अली अशरफ अली उर्फ डॉन व अफजल चौधरी शेख इस्माईल याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. कॅम्प परिसरातील रहिवासी प्रापर्टी ब्रोकर हेमंतकुमार व्यास यांचा हेमंत खत्री यांच्याशी संपत्तीचा वाद सुरु होता. संपत्तीच्या वादातून आरोपी हेमंत खत्री यांनी उपमहापौर शेख जफरच्या माध्यमातून हेमंतकुमार व्यास व त्यांचा मुलगा प्रशांत व्यास यांना धमकी देऊन संपत्ती नावावर करण्याची व ५ कोटी २८ लाख रुपयांची मागणी केली. त्याकरिता प्रशांत व हेमंतकुमार व्यास यांना शेख जफरने घरी बोलावून पाच तास डांबून ठेवले होते. व्यास यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत संपत्ती व पैशाची मागणी शेख जफरने केल्याची तक्रार प्रशांतने शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलीे. याप्रकरणी पोलिसांनी शेख जफर शेख जब्बार याच्यासह प्रविणचंद खत्री (५९), जयंत खत्री (३४), हेमंत खत्री (३७), सैय्यद आसिफ उर्फ डॉन काल्या, देवा, अफजल चौधरी यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ३४७, ३८७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणात पोलिसांनी शनिवारी आसिफ डॉन व अफजल चौधरीला अटक केली. दोन्ही आरोपींना दिवाणी न्यायालय क्रमांक ९ चे न्यायाधीश सु.शा.गवई यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी पक्षाकडून वकील शब्बीर हुसैन, शोएब खान व चिराग नवलानी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर दोन्ही आरोपींचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. शेख जफरच्या शोधात शहर कोतवालीचे एक पथक अकोला येथील नातेवाईकाकडे रवाना झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
शेख जफरच्या शोधात कोतवाली पोलीस अकोला रवाना
By admin | Published: August 24, 2015 12:36 AM