आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथक अमरावतीत दाखल, दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी सुसाईड नोटवर फोकस
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेत गठित चार सदस्यीय चौकशी पथक रविवारी दुपारी अमरावतीत दाखल झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील काही कागदपत्रांची पथकाने तपासणी केली. दरम्यान तेथील शासकीय विश्रामगृहात तिघांचे बयाण नोंदविण्यात आले.
मेळघाटातील हरिसाल येथे मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस या चमुने दीपाली प्रकरणाशी धागेदोरे असलेली कागदपत्रे, कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबाबतच्या आवक-जावक विभागातील नोंदी पथकाने तपासल्यात. रविवार सुटीचा दिवस असताना सुद्धा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालय या चौकशी पथकासाठी उघडण्यात आले होते. यावेळी कार्यालय अधीक्षक व्ही. पी. चव्हाण, आस्थापना विभागाचे विक्रम राय, आवक-जावक कर्मचारी संजय दुर्गे आदींनी या पथकाला कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहकार्य केले. आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथक हे दीपाली यांनी चारपानी सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या बाबीवर चौकशीच्या अनुषंगाने फोकस करीत आहेत. हे चौकशी पथक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कायदेशीर कारवाईसंदर्भात चौकशी करीत आहे. या पथकाने सदस्यांनी एकाचवेळी बयाण नाेंदविले व कागदपत्रांची पडताळणी केली.
------------------
दीपाली यांच्या पतीचे नोंदविले बयाण
आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी रविवारी सायंकाळी ४.३० वाजता दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांचे बयाण नोंदविले आहे. सुसाईड नोटमध्ये असलेल्या मुद्द्यावर काही प्रश्नांना अनुसरून राजेश माेहितेंकडून माहिती घेण्यात आली. वनपाल-वनरक्षक कर्मचारी संघटनेचे इंद्रजित बारस्कर, प्रदीप बाळापुरे यांचेही बयाण घेण्यात आले.
-----------------
आयपीएस प्रज्ञा सरवदे आज अमरावतीत
वनमंत्रालयाने दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक व सह व्यवस्थाकीय संचालक प्रज्ञा सरवदे यांच्यावर धुरा सोपविली आहे. आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चार सदस्यीय चौकशी पथक दाखल झाले आहे. सरवदे या सोमवार, २६ एप्रिल रोजी उशिरा सायंकाळी अमरावती येथे पोहचणार असून, मंगळवारी सकाळी ८ वाजतानंतर त्या हरिसालकडे रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.