अमरावती : फुलांचा वर्षाव, गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर, सोबतच गणरायांचा जयघोष करीत १४ विद्या अन् ६४ कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या बाप्पांचे मंगळवारी आगमन झाले. जिल्ह्यातील १७९४ सार्वजनिक मंडळांमध्ये गणराय विराजमान झाले आहेत. जिल्ह्यातील लाखो घरांमध्येदेखील हर्षोल्हासात विद्येची देवता असणाऱ्या गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.
पूजेत अथवा शुभकार्यात सर्वांत पहिले गणेशाचे आवाहन केले जाते. विघ्नहर्ता देवता असल्याने कुठल्याही कार्यात अडथळा येत नाही, अशी धारणा आहे. बाप्पांच्या आगमनाची वर्षभरापासून प्रतीक्षा असते. यंदादेखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळद्वारा अगोदरपासूनच तयारी करण्यात आलेली आहे. यंदादेखील शहरात ४४१ व ग्रामीणमध्ये १३५३ अशा एकूण १७९४ मंडळांमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे. याशिवाय ३३४ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेनुसार गणपतीची स्थापना मंगळवारी करण्यात आली आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात जिल्हा ग्रामीणमध्ये २२०० पोलिस कर्मचारी, ५०० होमगार्ड, १५० अधिकारी व याशिवाय ‘एसआरपीएफ’चे १०० बंदूकधारी कर्मचारी यांची करडी नजर राहणार आहे. याशिवाय पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात शहरातदेखील स्वतंत्र पोलिस बंदोबस्त राहणार आहे.