अमरावती : उमेदवारी अर्जाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी जिल्ह्यात ६४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी १३ अर्ज प्राप्त झाल्याने एकूण ६५९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. सलग तीन दिवस सुट्या आल्याने आता शेवटच्या तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धूमशान राहणार आहे.
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहिल्या दिवशी सहा तालुक्यात उमेदवारी अर्ज निरंक होते. मात्र, गुरुवारी ६४१ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात ६२, भातकुली ४६, तिवसा १२, दर्यापूर ८१, मोर्शी ६१, वरूड ३९,अंजनगाव सुर्जी ७६, अचलपूर २७, धारणी ४०, चिखलदरा २५, नांदगाव खंडेश्वर २५, चांदूर रेल्वे १९, चांदूर बाजार ७१ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान काही गावांत वाळू निर्गती धोरणासंदर्भात ग्रामसभा घेण्याबाबत सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेत कुठलीच आठकाठी नाही. मात्र, या ग्रामसभेत या धोरणाव्यतिरिक्त कुठल्याच विषयावर चर्चा करण्यात येणार नसल्याचे आयोगाने बजावले आहे.
बॉक्स
उमेदवार किमान ७ वी पास असावा
उमेदवार किमान ७ वी पास असावा किंवा ७ वी इयत्तेसी समतुल्य शौक्षणिक अर्हता असल्याशिवाय वा त्याने सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केल्याखेरीज त्यांना सदस्य म्हणून निवडून दिली जाण्यास अनर्ह असणार नाही, अशी यापूर्वीची अधिसुचना असल्याने उमेदवारांना अर्जासोबत या शौक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जोडावी लागणार आहे. तसे आयोगाचे गुरुवारचे निर्देश असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.