‘सत्यमेव जयते वॉटर कप’ प्रशिक्षण : पाणी फाऊंडेशनद्वारे जलव्यवस्थापनाचे धडे वरूड : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेकरिता अभिनेता आमिर खान आणि यांची पत्नी किरण राव यांनी ‘पाणी फाउंडेशन’ स्थापन करून ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये वरुड तालुक्याचा समावेश आहे. जल व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाकरिता तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींमधून ४३ जणांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरी तुकडी रवाना झाली. प्रशिक्षणार्थ्यांच्या चमुला दौऱ्याला नायब तहसीलदार कमलाकर देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखविली. अहमदनगर येथील हिवरे बाजार येथे आयोजित प्रशिक्षणामध्ये ‘जलव्यवस्थापन आणि पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कशी राबवायची? याचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा घेण्यात येत आहे. तालुक्यातील पाणीटंचाई आणि खालावलेली भूजल पातळी पाहता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबविणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून भूजलस्तर वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून अभिनेता अमिरखान आणि यांची पत्नी किरण राव यांनी पश्चिम महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तर मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याची निवड करण्यात आली आहे. याकरिता ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ची घोषणा केली आहे. ही स्पर्धा १५ एप्रिल ते ३१ मे २०१६ पर्यंत राहणार असून याकरीता तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रांमपचायतींना ५० लाख, ३० लाख आणि २० लाख रूपयांची अनुक्रमे तीन पारितोषिके दिली जातील. याकरिता प्रत्येक गावातून पाच सदस्य निवडून त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. हा कालावधी १५ मार्च ते १५ एप्रिल राहिल. दरम्यान वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड, टेंभूरखेडा, बेसखेडा, बेनोडा, बेलोरा, लिंगा, शिंगोरी, वघाळ, तिवसाघाट या ९ गावातून ४३ प्रशिक्षणार्थ्यांची पहिली तुकडी तीन दिवसांपूर्वी प्रशिक्षण घेऊन आली तर दुसरी तुकडी प्रशिक्षणासाठी रवाना झाली आहे. यामध्ये किमान दोन महिला आणि दोन पुरुष प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली होती. लोकसहभागतून ही योजना राबवून जलस्तर वाढविण्याचे प्रयत्न करण्याचे प्रशिक्षणादरम्यान सांगण्यात येईल, असे पथकाचे प्रमुख चिन्मय फुटाणे आणि अतुल काळे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
वरूडची दुसरी तुकडी हिवरे बाजारला रवाना
By admin | Published: March 26, 2016 12:05 AM