अमरावती : शहरातील बिच्छुटेकडी या झोपडपट्टी भागातून रॅपची सुरुवात करणारा सौरभ अभ्यंकर एकमेव रॅप रिॲलिटी शो ‘हसल’च्या तिसऱ्या पर्वात सेकंड रनरअप राहिला आहे. बुधवारी सौरभ अमरावतीत दाखल झाल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शहरातून स्वागत मिरवणूक काढण्यात आली.
सौरभने रॅपच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटातही सौरभने रॅप गायले आहे. याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्याने कामदेखील केले. रिॲलिटी शोमध्ये ‘अमरावतीचा पोट्टा’ रॅप सादर करून या शोमध्ये त्याने स्थान निश्चित केले होते. ग्रँड फीनालेच्या टॉप तीन स्पर्धांकापर्यंत सौरभ पोहचला होता. यावेळी त्याला ‘हसल’ ओजी हसलर या पुरस्कार देऊन पाच लाखांचा धनादेश व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मिरवणुकीत सौरभसोबत सेल्फी काढण्यासाठी शेकडोंच्या संख्येने शहरातील युवक या रॅलीत सहभागी झाले होते.