सुमित हरकूट
चांदूर बाजार : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गाव-खेडेपर्यंत सर्वांनी मदतीचे हात पुढे केले होते; परंतु दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिक भरडून जात असताना यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मदत करणारे गायब झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये बहुतांश राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व समाजातील अनेक नागरिकांनी परिसरातील गोरगरीब, गरजूंना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, पीठ, तूर डाळ आदी विविध वस्तू वाटप केल्या होत्या. कुणीही उपाशी राहू नये, यासाठी सर्व जण काळजी घेत होते; मात्र यंदा संचारबंदीत कोरोनामुळे गोरगरीब मजुरांकडे काम नाही. विहित वेळेत व्यवसाय करावा लागत आहे. अशात आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न अनेक नागरिकांपुढे उभा ठाकला आहे.
मात्र अशा बिकट परिस्थितीमध्येही त्यांना कोणीच मदतीचा हात देत नाही, जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण भागातील दानदातेदेखील दिसून येत नाहीत. जिल्हावासीयांवर सलग तीन महिन्यांपासून संचारबंदीचा बडगा आहे. होती नव्हती ती शिल्लक, घरातील मौल्यवान वस्तूंची मोड करून उपजीविका भागविली गेली; मात्र आता ग्रामीण भागातील लोकांना दोन वेळच्या जेवणाची समस्या भेडसावत आहे.
फोटोसेशन करणारे कुठे?
मागच्या वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत कार्य तसेच फोटोसेशन करणाऱ्यांनी यंदा मदतीचा हात आखडता घेतला आहे. मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य कदाचित संपले नसावे, असा धान्य देणाऱ्यांचा समज झाला असावा, असे दिसत आहे. मागील लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य सरकारने शिस्तबद्धरीत्या तालुक्यातील गावागावात नागरिकांना मदतीचा हात दिला. या महत्त्वाच्या कार्यात सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्या दानदात्यांनी गरिबांपासून डिस्टन्सिंग राखले आहे.
बॉक्स २
गरजवंतांना आता खरी मदतीची गरज
गेल्या वर्षी कोरोना काळात अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गरजवंतांना मदत केली; मात्र काहींनी केवळ फोटोसेशनसाठी मदत केली होती, हे सर्वश्रुत आहे. तर काही सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी मात्र प्रामाणिक मदत केली. अनेकांनी तर मदतीचा थांगपत्ताही लागू दिला नाही. यावर्षी पुन्हा कोरोनाने आक्रमण केले आहे. अशा वेळी मदत करणाऱ्या प्रामाणिक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे; मात्र सर्व संघटना व कार्यकर्ते कुठे गेले, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.