अमरावती : काही दिवसांवर आषाढी एकादशी असून, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूर वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परिणामी महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पांडुरंगाची वक्रदृष्टी कायम राहिल्याने एसटीला ४६ लाखांवर हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.
दरवर्षी हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अधिक जण परिवहन महामंडळ तसेच खासगी वाहनांव्दारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी वारीने पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते एसटीने वारी करतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकऱ्यांची मांदियाळी असते तसेच महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील दोन्ही एकादशीलादेखील जिल्ह्यातील अनेक भाविक पंढरपूरला हजेरी लावतात. वारकऱ्यांनकडून एसटीच्या विशेष सेवेला पसंती मिळत असते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे आषाढी वारीला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य शासनाने एसटीने संतांच्या दहा मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. यात कौंडण्यपूर येथीलही पालखीचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्येही जिल्ह्यातून ५९ बसेसमधून २४५ फेऱ्याव्दारे १६,१४९ प्रवाशांनी वारी केली होती. त्यातून परिवहन महामंडळाला ४६ लाख ४७ हजार ९३९ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा एसटी महामंडळाला लाखो रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे. दरम्यान काही वर्षापासून परिवहन महामंडळ तोट्यात आहे.
बाॅक्स
कोरोनाचाही फटका
कोरोनाचा देखील मोठा फटका एसटीला सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतदेखील परिवहन सेवा सुमारे दोन ते अडीच महिने बंद होती. परिणामी महामंडळाची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे. आता आषाढी वारी रद्द झाल्याने लालपरी आर्थिक संकटात सापडणार आहे.
कोट
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून एसटी महामंडळाची आर्थिक नुकसान होत आहे. सर्व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे अमरावतीतून पंढरपूर बस सेवा विस्कळीत झाली आहे. अशातच एक बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येत होती. मात्र, तिलाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तिही बंद करण्यात आली आहे.
- श्रीकांत गभने,
विभाग नियंत्रक