जगदंबा महाविद्यालयाचे कोडे सुटेना : पोलीस तपासताहेत सर्व शक्यता सुनील देशपांडे अचलपूर दोन दिवसांपूर्वी स्थानिक जगदंब महाविद्यालयातील ग्रंथालयात वारंवार लागलेल्या आगीचे रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहे. हे एखाद्याने रचलेले षड्यंत्र होते की, मुद्दाम खोडसाळपणे केलेला प्रकार होता, हे कोडे अजूनही पोलीस किंवा महाविद्यालयीन प्रशासन अजूनही उलगडू शकले नाही. जगदंब विणकर शिक्षण संस्थाद्वारे संचालित जगदंब महाविद्यालयात प्रशस्त ग्रंथालय आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ग्रंथालयाच्या कोपऱ्यातील कपाटाला आग लागली. त्यात ८ ते १० पुस्तके अर्धवट जळाली. ही आग दिसताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ विझवली. पुन्हा १५ ते २० मिनिटांनी ग्रंथालयातील दुसऱ्या कोपऱ्यातील कपाटाला आग लागली. दर साधारण अर्धा ते एक तासाच्या दरम्यान ग्रंथालयात लहान आगी लागत होत्या. हा प्रकार रात्री साडेबारापर्यंत सुरू असल्याने महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार कदाचित भानामतीचा असावा, अशी चर्चा शहरात होती.रात्रीचे बारा वाजले तरी आग लागण्याचा प्रकार थांबत नसल्याने रात्री कर्मचाऱ्यांना बोलावून सर्व पुस्तके बाहेर काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी पोलीस ठाणे सरमसपुरा येथे आगीबाबत फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी आगीच्या कारणाचा अंदाज घेण्यासाठी सर्व बाबी तपासत असताना एका पुस्तकात फॉस्फरसयुक्त काड्या आढळल्या. या काड्या नेमक्या कोणत्या द्रावणात मिसळल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवल्या जाणार आहेत. ही आग जाणूनबुजून लावली की काय, असा प्रश्नदेखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. हा घात आहे की, अपघात हे आताच सांगणे कठीण आहे. वारंवार आगी कशा लागल्या हे एक कोडेच असून याचा शोध पोलीस घेऊन त्या समाजकंटकाचा बुरखा पोलीस कारवाई करून फाडतील. पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी.- रमाकांत शेरेकार, अध्यक्ष, जगदंब महाविद्यालयपोलिसांना जगदंब महाविद्यालयातील ग्रंथालयात वारंवार आगी लागल्याचा फोन आला. पोलिसांनी येथे पोहोचून चौकशी केली. तशी नोंदही पोलीस स्टेशनला आहे. पण हा प्रकार वारंवार होत असला तरी अजूनपर्यंत तेथील प्राचार्यांची याबाबत फिर्याद आलेली नाही.- रवींद्र रेवतकर, पीएसआय, सरमसपुरा पोलीस ठाणेग्रंथालयात हजारो पुस्तके आहेत. वारंवार लागलेल्या आगीने जवळपास ४० पुस्तके जळाली आहेत. या प्रकरणात दोषी कोण, याचा शोध पोलिसांनी घेऊन कारवाई करावी.- प्रभाकर रोहनकर,प्राचार्य, जगदंब महाविद्यालय
अचलपुरात आगीचे रहस्य गुलदस्त्यात
By admin | Published: March 27, 2016 12:06 AM