कॅप्शन - ना. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटात महिला वनकर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावरील असतानाच्या अडचणी जाणून घेतला तो क्षण.
-----------------------------------------------------------------
महिला, बाल कल्याण मंत्र्यांचा मेळघाटातील दुर्गम गावात गोपनीय दौरा
महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद, अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा
अमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार करावा. कुठेही अपप्रकार होत असल्यास लगेच तक्रार द्यावी. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा संवाद राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला.
हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी आत्महत्या केल्यानंतर ना. ठाकूर यांचा हा गोपनीय दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना कामात येणाऱ्या अडचणी, वरिष्ठांचा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागात सलग तीन दिवस गोपनीय दौरा केला. महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्याशी चर्चा करून मनोबल वाढविले. यावेळी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपवनसंरक्षक अविनाश कुमार, नवलकिशोर रेड्डी, पीयूषा जगताप आदी उपस्थित होते. धारणी तालुक्यातील मांगीया, हरिसाल, बोरी, लवादा, चित्री तसेच चिखलदरा तालुक्यातील जैतादेही, मोथा, आमझरी, शहापूर या गावांबरोबरच अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील धारगड येथेही ना. ठाकूर यांनी भेट दिली.
------------------
महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद, चर्चा
ना. ठाकूर यांनी महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. वरिष्ठांची वागणूक, अवमानजनक भाषेचा वापर, योग्य मार्गदर्शनाऐवजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणे, त्यांना म्हणणे मांडण्याची संधी न देणे, कॅम्पवर स्वतंत्र स्वच्छतागृह नसणे, मानसिक छळ, विशेष व्याघ्र संरक्षक दलातील वनकर्मचाऱ्यांचे रखडणारे पगार अशा गंभीर तक्रारी या भगिनींकडून होत आहेत. वन प्रशासनाने तात्काळ तक्रारींचे निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
-----------------
विशाखा समितीचे कार्य योग्यरीत्या चालवा
महिला तक्रार निवारण समितीने प्रत्येक तक्रारीची वेळीच दखल घ्यावी. महिला वनकर्मचाऱ्यांना म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी व त्यासाठी त्यांना परवानगीची गरज पडू नये, असे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिले. मेडिटेशन कॅम्प घेण्याचीही सूचना त्यांनी केली.
-----------------
- तर माझ्याशी थेट बोला, संपर्क साधा
महिला वनकर्मचाऱ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. माझ्या फेसबूक पेजवर मोबाईल क्रमांक आहे. मला व्हाॅट्सॲपवर संदेशही पाठवता येईल. निर्भीडपणे समस्या मांडा. अन्यायाचा प्रतिकार करा. आता यापुढे दीपाली प्रकरण होता कामा नये, असे ना. ठाकूर म्हणाल्या.
-------------------
समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
विशेष व्याघ्र संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार, महिला वनकर्मचाऱ्यांनाही केंद्राप्रमाणे बालसंगोपन रजा व इतरही मुद्दे, समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वास महिला व बाल विकास मंत्र्यांनी यावेळी दिला.
--------------