लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी डांबून ठेवले जातात. मात्र, तुलनेने त्यांच्या सुरक्षेसाठी तोकडी व्यवस्था आहे. यामुळे कारागृहाच्या अंतर्गत व बाह्यसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच नागपूर तुरूंगातील जन्मठेपेचा कैदी आयुष पुगलिया याच्या हत्याप्रकरणाने कारागृहातील सुरक्षा रक्षकांच्या कमी संख्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.अमरावती मध्यवर्ती कारागृहात सद्यस्थितीत १०८० कैदी असून अधिकारी, कर्मचाºयांच्या रिक्तपदांमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कारागृहाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेची जबाबदारी हाताळणाºया सुरक्षा रक्षकांची वानवा असल्याने अधीक्षकांना अनेक बिकट प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. तुरूंगाधिकारी, सुभेदार, सुरक्षा रक्षक अशा विविध पदांसोबतच कार्यालयीन कर्मचाºयांची देखील अनेक पदे रिक्त आहेत. न्यायालयीन कामकाज हाताळण्यासाठी स्वतंत्र तुरूंगाधिकाºयाचे पद आहे. मात्र, या पदावरही कायमस्वरुपी अधिकारी नसून ‘प्रभारी’कारभार सुरु आहे. कारागृहाच्या सुरक्षेमध्ये सुरक्षा रक्षक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असताना अमरावतीत १४ सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे बाह्य सुरक्षेसाठी होमगार्डची सेवा घेण्याचा प्रसंग कारागृह प्रशासनावर ओढवतो. अमरावती कारागृहात नक्षलवादी, टाडा, मुंबई बॉम्बस्फोट, प्रसिद्ध खून खटल्यातील आरोपी आहेत. त्यामुळे अंतर्गत, बाह्य सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाची कसरत होत आहे.‘बाबा’ सांभाळतात सुरक्षा व्यवस्थाकारागृहात विशिष्ट कालावधीत शिक्षा भोगल्यानंतर कैद्यांना ‘बाबा’ ही पदवी मिळते. हे ‘बाबा’ म्हणजे सिनिअर बंदी आहेत. जन्मठेपेच्या कैद्यांना कारागृहात बराकीची सुरक्षा हाताळण्याची जबाबदारी सोपविली जाते. या ‘बाबां’ना कारागृहाच्या आतील बºयाच गोष्टी अवगत असतात. त्यामुळे ‘बाबां’ना झालेल्या शिक्षेची पार्श्वभूमी तपासून त्यांना बराकीची सुरक्षा सोपविली जात असल्याची माहिती आहे.सुरक्षा रक्षकांच्या १४ जागा रिक्त आहेत. रिक्तपदांची समस्या सर्वच कारागृहांमध्ये आहे. रिक्तजागांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, यासाठी वरिष्ठांकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह
कारागृहात सुरक्षा रक्षकांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 10:56 PM
कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी डांबून ठेवले जातात. मात्र, तुलनेने त्यांच्या सुरक्षेसाठी तोकडी व्यवस्था आहे.
ठळक मुद्देजागा रिक्त : कैदी आयुष पुगलिया हत्या प्रकरणानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर