क्रीडा उपसंचालकांचे दुर्लक्ष : पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभावसंदीप मानकर अमरावतीविभागीय क्रीडा संकुलच्या उजव्या बाजुचे प्रवेशव्दार नेहमीच बंद राहत असल्याने येथे प्रेमीयुगुलांचा व शहरातील टवाळखोर युवकांचा वावर वाढला आहे. त्यामुळे येथे नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंना धोका निर्माण झाला आहे. येथे स्केटिंगकरीता चिमुकल्यांसोबत महिला, पालकही उपस्थित राहतात. त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांचे दुर्लक्ष असल्याने काही अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा क्रीडाप्रेमींचा सवाल आहे. येथील क्रीडा उपसंचालक कार्यालयातून पाचही जिल्हयाचा कारभार चालतो. येथेच जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी कार्यालयसुध्दा आहे. येथे विविध खेळ खेळल्या जातात. त्यामुळे अनेक खेळाडू येथे नियमित सराव करण्यासाठी येतात. या ठिकाणी सायंकाळी मुलांना स्केटिंग शिकविण्यात येते. त्यांच्याकरीता विविध स्पर्धा राबविण्यात येतात. त्यामुळे महिला पालकांचीही येथे वर्दळ असते. तसेच विविध खेळांचा सराव करण्यासाठी अनेक महिला क्रीडापटूसुद्धा येथे सायंकाळी सराव करतात. मात्र या क्रीडा संकुलाचे उजवीकडील प्रवेश द्वार अनेक दिवसांपासून बंद आहे. या ठिकाणी सायंकाळ झाली की अंधाराचा फायदा घेता काही प्रेमीयुगुल व गुंड प्रवृत्तीच्या टवाळखोरांचा ठिय्या ही नित्याचीच बाब झाली आहे. प्रेमीयुगुलांच्या किळसवाण्या प्रकाराने अनेकदा नागरिकांना शरमेने खाली मान घालावी लागते. येथे गांजासारख्या मादक पदार्थाचे सेवनही करतात. या असामाजिक तत्वांच्या वावरामुळे क्रीडा संकुलावर सरावासाठी येणाऱ्या महिला क्रीडापटूंची सुरक्षा धोक्यात आहे. या परिसरात काही अनुचित प्रकार झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल सुज्ञ पालकांनी उपस्थित केला आहे. खेळाडुंना येथे सराव करता यावा, यासाठी शासनाने कोट्यवधींचे क्रीडांगण, प्रशस्त इनडोअर स्टेडिअम स्थापित केले आहे. मात्र, या क्रीडा संकुलाचे मुख्य प्रवेशद्वार आता असामाजिक तत्वाचा अड्डा बनल्याने या क्रीडा संकुल निर्मितीच्या उद्देशाला बाधा पोहोचल्याचे चित्र आहे. अनेक खेळांचा होतो सरावविभागीय क्रीडा संकुल व इनडोअर हॉलमध्ये स्केटिंग, लॉन टेनिस, बॅटमिंटन, कुस्ती, फायरिंग, ज्युदो कराटे, बास्केटबॉल यांसह क्रीडाप्रकारातील अनेक खेळ नियमित खेळल्या जातात. विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, सराव केला जातो. येथे काही खेळांच्या सरावासाठी शुल्कदेखील आकारल्या जाते. शुल्कापोटी मिळणाऱ्या रकमेतून संकुलाची देखभाल दुरुस्तीची कामे केली जात असल्याची माहिती आहे. पाच जिल्ह्यांचा चालतो कारभार पाचही जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुल, तालुका क्रीडा संकुलावर नियंत्रण ठेवणे, त्याला मान्यता देणे, त्यांच्या अनुदानावर लक्ष ठेवणे, विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धा आयोजीत करण्याचे तसेच विद्यार्थ्यांकरीता उन्हाळी क्रीडा स्पर्धा आयोजीत करणे आदी महत्वाचे काम येथील विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या कार्यालयामधून चालते. येथे विभागीय क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची स्वतंत्र कार्यालय आहेत. त्यामुळे येथे अनेक शाळांच्या क्रीडा शिक्षकांचा व अनेक खेळाडुंचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे येथील विभागीय क्रीडा संकुलास सुरक्षा आवश्यक असल्याचे मत क्रीडापे्रमींकडून व्यक्त होत आहे. लखलखीत प्रकाशव्यवस्थेचा अभावप्रवेशव्दारावर पे्रमीयुगुलांचा व शहरातील गुंड प्रवृत्तीच्या व टवाळखोर तरुणांचा नेहमीच राबता असतो. येथे सायंकाळनंतर पुरेसा प्रकाश नसल्याने गैरवर्तन करणाऱ्यांसाठी येथे नेहमीच संधी मिळते. किंबहुना प्रवेशद्वारापासूनच त्यांचा ठिय्या असल्याने क्रीडापटूंची सुरक्षा वाऱ्यावर आहे. लखलखीत प्र्रकाश व्यवस्थेचा अभाव आहे.
खेळाडूंची सुरक्षा धोक्यात, प्रवेशव्दार केव्हा उघडणार ?
By admin | Published: February 16, 2017 12:08 AM