अमरावती : सोयाबीन पिकात खोडमाशी, मावा, पांढरी माशी, फुलकिडे व खोडकुज रोगाचे व्यवस्थापनासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून बीजप्रक्रिया अत्यंत गरजेची असल्याचे मत कीटकशास्त्रज्ञ अनिल ठाकरे यांनी मांडले.
कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्यास रस शोषण करणाऱ्या किडी, खोडमाशी व इतर किडीपासून पीक किमान एक महिन्यापर्यंत सुरक्षित ठेवू शकतो. जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया केल्यास पीक उत्पादनात १०-१५ टक्के वाढ होते. जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते व रासायनिक खताची बचत होते.
बीजप्रक्रिया प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची व कीडनाशकाची १ते ८ दिवस पेरणीपूर्वी आपल्या सोयीनुसार करावी व त्यानंतर पेरणीच्या दिवशी दोन तास आधी जैविक बुरशीनाशक व संवर्धक खताची बीजप्रक्रिया करावी. त्याकरिता कार्बोक्झीन ३७.५ टक्के, थायरम ३७.५ टक्के, मिश्र घटक बुरशीनाशक ७५ टक्के, थायमीथोक्झाम ३० टक्के, एफ.एस. १० मिली प्रतिकोली बियाण्यास लावावे. पेरणीच्या दिवशी ट्रायकोडर्मा विरीडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रतिकिलो, ब्रेडिरायझोबीयम जपोनिकम या जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम अधिक पी.एस.बी. जिवाणू संवर्धक २० ग्रॅम प्रतिकिलो बीजप्रक्रिया करावी, असे वनस्पती रोगशास्त्रज्ञ राजीव घावडे यांनी सांगितले.