अमरावती : दुष्काळी परिस्थिती व वाढत्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेता शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना येथे कृषी क्रांती शेतकरी समूहाचा पहिला उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरूवात गुरूवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे अधिकाअधिक पर्याय कृषिसेवा सुविधा उपक्रमातून देण्यासोबत अधिकाधिक उत्पादन मिळण्याच्या दुष्टीने राजना, कवाळा जटेश्र्वर व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खरीप हंगापासून शेतकऱ्यांना थेट बांधावर व स्वस्तात बी-बियाणे पुरविण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. ही बाब अतिशय चांगली असून यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे, रासायनिक खते यामध्ये होणारी फसवणूक गैरप्रकार नक्कीच थांबणार आहे, असे प्रतिप्रादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे सीईओ अनिल भंडारी होते. कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, सहयोगी संशोधन संचालक सी.यू.पाटील, प्रवीण देशमुख, कृषी अधिकारी साबळे, नाबार्डचे वाघमारे, जि.प.सदस्य रवींद्र मुंदे, सरपंच लता पाटेकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गित्ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना पाऊस पडला म्हणजे त्यांचे सर्व प्रश्न संपले असे होत नाही. त्यांना प्रामुख्याने प्रश्न पडतो की आता पिकासाठी कोणते बियाणे घेतले पाहिजेत, कोणत्या किमतीत मिळेल, शेतीला बियाणे पूरक ठरतील का, अशा सर्व प्रश्नांसाठी कृषी सुविधा केंद्रातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात येत आहे. पाऊस कमी किंवा अधिक झाला तर कोणते पीक घेता येते या सर्व बाबींविषयी माहिती शेतकरी कृषी सुविधा केंद्रातून मिळू शकते. या तालुक्यात कोणतेही मोठे सिंचन प्रकल्प नाही. पुढील वर्षी या तालुक्यातील गावांनी अर्ज सादर करुन या अभियानात गावांचा समावेश करण्यात येईल. गावातील नाले अडवून त्यांचे खोलीकरण केले व सिमेंट बंधारे बांधले तर गावातील शेतकऱ््यांना आपल्या शेतीसाठी पाणी मिळेल तसेच त्यांना पाण्याची टंचाई भासणार नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा नवीन थेट बियाने , खते पुरविण्याचा उपक्रम सुरू केल्याने या भागातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. कृषी क्रांती शेतकरी समूहाचे अध्यक्ष रविद्र मुंदे यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी कृषि क्रांती शेतकरी समुहाचे पदाधिकारी रविंद्र मुंदे,बंडूपंत रोहनकर, दिलीप बोरकर, रामकृष्ण वाघमारे, संतोष देवतळे, प्रवीण बागडे, रामभाऊ हेरोळे संतोष लवंगे, रामसिंग धुर्वे, रामदास पवार, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे पाणलोट समितीचे रूपांतर कृषि क्रांती शेतकरी समुहात करून शेतकऱ्यांना दिलासा देणारा जिल्ह्यात पहिला उपक्रम नांदगाव तालुक्यात सुरू झाला आहे.
बांधावर पोहोचणार बियाणे, खत
By admin | Published: June 19, 2015 12:44 AM