घबराट : दर्यापूर, धारणी, परतवाड्यात इमारतींना हादरे, मोर्शीतील यंत्रात नोंददर्यापूर, अचलपूर, धारणी, मोर्शी : शनिवारी दुपारी ११.४५ ते १२ वाजताच्या दरम्यान जिल्ह्यातील परतवाडा, दर्यापूर आणि धारणी तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले. नेपाळसह भारतातील अनेक ठिकाणी भूकंपाने कहर केला. भूकंपाच्या या लहरी जिल्ह्यातील काही ठिकाणी ठळकपणे जाणवल्या. मात्र, कोठूनही जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही. मोर्शी येथील अप्पर वर्धाच्या रिस्टस्केल यंत्रावर दुपारी नेपाळमधील भूकंपाच्या तीव्रतेची नोंद झाली आहे.दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले. येथील कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत ७ ते १० सेकंदांपर्यंत हलल्याचा अनुभव येथील कर्मचाऱ्यांनी विशद केला. टेबलवर ठेवण्यात आलेल्या वस्तू अचानक पडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भूकंपाची चर्चा सुरू झाली. परतवाड्यात अनेक ठिकाणी काही सेकंंदांच्या फरकाने भूकंपाचे धक्के जाणवले. (लोकमत चमू)दोन वर्षांपूर्वी साद्राबाडीत झाली होती पडझड४२४ सप्टेंबर २०१३ मध्ये धारणीतील साद्राबाडी गावात रात्री ८ वाजता भूकंपाचे अनेक हादरे व थरारक आवाज गावकऱ्यांनी अनुभवले. भूगर्भातील हालचालींनी अनेक घरांना भेगा पडल्या होत्या. याच साद्राबाडीला लागून खापरखेडा हे गाव आहे. शनिवारी झालेल्या भूकंपाचे केंद्र मध्य प्रदेशात असल्याने महाराष्ट्रात त्याची कंपणे जाणवल्याची चर्चा आहे. धारणीतील भूकंपमापक यंत्र बेपत्ताधारणीपासून ४ किमी अंतरावरील खाऱ्याटेंभरु येथे १९७५ साली तापी नदी काठी भूकंपमापन यंत्र लावण्यात आले होते. हे यंत्र गेल्या १० वर्षांपासून बेपत्ता आहे. येथील सरिता भूमापन केंद्रात अधिकारीच नसल्याने शनिवारी जाणवलेल्या धक्क्यांची माहिती मिळू शकली नाही. तापी नदीच्या काठावरील धारणी तालुक्याने आजवर अनेकदा भूकंपाचे झटके अनुभवले आहेत. मोर्शी येथे ५.५ आणि ५.१ रिस्टर स्केलची नोंद अप्पर वर्धा येथील भूकंपमापन यंत्रावर शनिवारी दुपारी ११ वाजून ३२ मिनिटे ५० सेकंदाला ५.५ रिस्टर स्केल तर त्यानंतर १२ वाजून १७ मिनिटे २० सेकंदांनी ५.१ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू १८०० कि.मी.अंतरावर असल्याचे हे भूकंपमापन यंत्र दर्शवित आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू लांब अंतरावर असल्यामुळे प्रत्यक्षात मोर्शी आणि परिसरात कोठेही भूकंपाचा प्रत्यक्ष धक्का जाणवला नाही. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. येथील भूकंपमापन केंद्र हे अती संवेदनशील असून सातत्याने भूगर्भातील नोंदी येथे घेतल्या जातात. यापूर्वी जपान, इंडोनेशिया, मध्य-पूर्व देश आणि पाकिस्तानात झालेल्या भूकंपाच्या नोंदीसुध्दा या भूकंपमापन केंद्रावर अत्यंत काटेकोरपणे नोंदविल्या गेल्या आहेत. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची नोंद अप्परवर्धा येथील भूकंपमापक यंत्रावर ५.१ रिस्टर स्केल एवढी झाली आहे. परंतु जिल्ह्यात काळी माती असल्यामुळे याचा फारसा परिणाम जिल्ह्यात झाला नाही.- किरण ग’त्ते,जिल्हाधिकारी, अमरावती भूकंपाचा धक्का जाणवला नाही. तशी माहितीही मिळाली नाही. किंवा तक्रारही आली नाही. त्यामुळे ठोस असे काही सांगता येणार नाही. शिवाय येथे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र नाही. - मनोज लोणारकर,तहसीलदार, अचलपूरपोलीस ठाण्यात खुर्चीवर बसलो असताना दुपारी पावणेबाराच्या सुमारास खुर्ची हलल्यासारखे जाणवले. कार्यालयाबाहेर येऊन सहकाऱ्यांना विचारले असता त्यांनादेखील हाच अनुभव आल्याचे सांगितले.- गिरीश बोबडे,ठाणेदार, परतवाडाचेंबरमध्ये एका व्यक्तिसोबत चर्चा सुरू असताना अचानक चक्कर आल्यासारखे वाटले. तिसऱ्या माळ्यावरून काही लोक पळत खाली आले. दोन्ही बाजूंनी इमारत हलल्याचे सांगितले. - एस.एम.खेरडे,प्राचार्य, कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालय.दुपारी १२ वाजता महाविद्यालयाचे कामकाज सुरू असताना अचानक इमारत हलल्याचा भास झाला. टेबलवरील वस्तू खाली पडल्या. त्यानंतर लगेच नेपाळमध्ये भूकंप झाल्याचे कळले. - हेमंत धुमाळे, दारापूर अभियांत्रिकी महाविद्यालय.
भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी खळबळ
By admin | Published: April 26, 2015 12:24 AM