अमरावती : ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी अटक आरोपींकडून जप्त केलेल्या दुचाकींची संख्या तब्बल ५० वर पोहोचली आहे. आरोपींची संख्या वाढून नऊ झाली आहे. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली. यात केवळ मुख्य सूत्रधार असलेला नौशाद अली आणि बनावट आरसी व आधार कार्ड बनविणारा सरफराज मन्सूर अली शाह यांचे ‘कनेक्शन’ उघड झाले आहे. सर्व आरोपी चांदूर बाजार तालुक्यातील असले तरी वरील दोघांशिवाय उर्वरित जण परस्परांना ओळखत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सरफराज मन्सूर अली शहाकडून बनावट आरसी व आधार कार्ड बनविण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले जाणार आहे. आरोपीने बनावट आरसी बनविण्यासाठी ज्या अॅपवरून दुचाकीचे नंबर मिळविले, त्या क्रमांकांची शहानिशादेखील करण्यात येत आहे. यासोबतच बनावट आधार कार्ड नेमके कसे बनविण्यात आले, याची चौकशी केली जात आहे. आरोपींचे इंटरकनेक्शनदेखील तपासले जाणार आहे.
आज संपणार पोलीस कोठडीची मुदत
चार दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यांना बुधवारी दुपारी पुन्हा न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती ब्राम्हणवाडा थडी येथील पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी संजय शिंदे यांनी दिली.