अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या २८ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्त्वावर (सीएचबी) ३१० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शासननिर्णयानुसार तासिकाप्रमाणे ६०० रुपये मानधन शिक्षकांना मिळणार आहे.विद्यापीठ प्रशासनाने ५, ६ व ७ आॅगस्ट रोजी पदव्युत्तर २८ विभागांसाठी सीएचबी शिक्षकांची भरतिप्रक्रिया राबविली. यात ४५० उमेदवारांनी मुलाखती दिल्यात. थेट मुुलाखत आणि कागदपत्राअंती ३१० शिक्षकांची तासिका तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. सीएचबी शिक्षकांच्या मुलाखती कुलगुरू मुरलीधर चांदेकर, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता आणि विभागप्रमुखांनी घेतल्या. या भरतीसाठी विद्यापीठाने आॅनलाईन अर्ज मागविले होते. भरतीत आरक्षणानुसार सीएचबी शिक्षकांची निवड करण्यात आली. सीएचबी शिक्षकांना विषय पदव्युत्तरासाठी ५५ टक्के गुणांची अट होती, तसेच नेट-सेट, पीएच.डी.धारकांना प्राधान्य देण्यात आले.या विभागासाठी सीएचबी शिक्षकांची निवडअमरावती विद्यापीठात २८ विभागांसाठी सीएचबी शिक्षकांची निवड झाली. यात गणित, सांख्यिकी, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशासत्र, भौतिकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, रसायन तंत्रज्ञान, भूगर्भशास्त्र, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, एमबीए, कॉमर्स, आजीवन शिक्षण, गृहविज्ञानशास्त्र, शिक्षण, शारीरिक शिक्षण, वाचनालय आणि माहिती विज्ञान, महिला शिक्षण केंद्र, संगणक, इंग्रजी, हिंदी, सामाजिकशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, विधी आदी विभागांचा समावेश आहे.
सीएचबी शिक्षकांच्या मुलाखतीअंती निवड करण्यात आली आहे. आता पदव्युत्तर विभागात नियुक्ती दिली जाईल. शासननिर्णयानुसार तासिकाप्रमाणे मानधन देण्याची तरतूद आहे.- तुषार देशमुख,कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ