अमरावती : उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘कथाकथन’ या लोकप्रिय वाङ्मयीन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान यंदा विदर्भाकडे आले आहे. ख्यातनाम कथालेखक व ज्येष्ठ साहित्यिक सतीश तराळ हे कथाकथनाचे अध्यक्ष राहतील. हा कार्यक्रम तेथील सभागृह क्रमांक १ या मुख्य सभागृहात शनिवार ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.
‘श्वास’ या मराठी चित्रपटाच्या कथालेखिका माधवी घारपुरे, सरोज देशपांडे, विलास सिंदगीकर, रवींद्र पांढरे, रवींद्र भयवाल आदी कथालेखक यावेळी कथा सांगतील. कथाकथनाचे सूत्रसंचालन दौलत निपाणकर करणार आहेत.