जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ११ कोटींवर निधी खर्च
अमरावती : जिल्ह्यात सन २०१७-१८ पासून राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषिक्रांती याेजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ७४८ शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ११ कोटी १५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. या योजनेमुळे मागासवर्गीय शेतकरी सिंचनाबाबत स्वावलंबी झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजना राबविण्यात येतात. यामध्ये नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपयाचे मर्यादेत अनुदान दिले जाते तसेच विहीर पूर्ण केल्यानंतर लाभार्थीला विद्युत जोडणी, विद्युत पंप, सौर कृषी पंप, सूक्ष्म सिंचन आदीकरिता पॅकेज स्वरूपात अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाईन प्रणालीने शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शेतीचे क्षेत्र आदी बाबींची तपासणी करून या योजनेतून लाभार्थींची निवड करण्यात येते. योजनांची परिणामकारक अंमलबजावणी केली जात असल्याने शेतकऱ्यांंचे बागायती शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे.
बॉक्स
तालुका पूर्ण झालेल्या विहिरी
अमरावती १५९, भातकुली १०५,नांदगाव खंडेश्वर १८३, चांदूर रेल्वे १४५, धामणगाव रेल्वे १५५, तिवसा १५२, मोर्शी ३३, चांदूर बाजार ४५, अचलपूर १७, अंजनगाव सुर्जी २२, दर्यापूर १६८, धारणी ४९, चिखलदरा तालुक्यात ५१ याप्रमाणे अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांच्या शेतात १२८४ विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. अनुसूचित जमाती लाभार्थींच्या ४६४ विहिरी पूर्ण झाल्या आहेत.