अमरावती : विविध योजनांचे आमिष दाखवून गूंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या पॅनकार्ड क्लब्जसह या कंपनीशी संलग्न इतर प्रतिष्ठानांची मुंबईतील जप्त स्थावर मालमत्ता विक्री करण्यात येणार आहे. त्या पैशांतून अमरावतीमधील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेतर्फे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सह मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
अमरावती शहरात पॅनकार्ड क्लबनी गुंतवणूकदारांना विविध योजनांचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांनी गंडविले. आतापर्यंत पॅनकार्ड क्लब्जविरोधात ४१० नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये २ कोटी ६० लाखांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पॅनकार्ड क्लब्जने मुंबईतील गुंतवणूकदारांचीही फसवणूक केली आहे. तेथील कंपनीची जप्त मालमत्ता विक्रीची प्रकिया सुरू आहे. यामध्ये मुंबईतील मोठे हॉटेल्स व इमारतींचा सहभाग आहे. ती मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सेबीने सुरू केली आहे. अमरावतीमध्येही पॅनकार्ड क्लब्जने ज्या ग्राहकांची फसवणूक केली, त्यांचे पैसे परत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गुंतवणूकदारांना पैसे परत मिळावे, या उद्देशाने आर्थिक गुन्हे शाखेने सेबीला व मुंबईचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले आहे.
पॅनकार्ड क्लब्जची मुंबईतील संपत्ती विक्री केली जात असून, त्या पैशांतून अमरावतीमधील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळू शकतात. त्या अनुषंगाने मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. - पंजाब वंजारी, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती