एफडीएची पोलखोल ? : अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई नाहीसंदीप मानकर अमरावतीजिल्ह्यात सर्व नियम धाब्यावर बसवून गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. 'लोकमत'ने बुधवारी पुन्हा स्टिंग करून एफडीएच्या अधिकाऱ्यांची पोलखोल केलीे आहे. यापूर्वी रविवारी ‘स्टिंग'द्वारे गुटखाविक्री होत असल्याचे वृत्त सचित्र पुराव्यासह 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले होते. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची कुठलीही दखल घेतली नाही. बुधवारी ‘लोकमत’च्या चमुने शहरातील विविध मुख्य चौकात पुन्हा ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यावेळी प्रभात चौक, बसथानक चौक व जिल्हाधिकारी कार्यालया परिसरातील जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील पानटपऱ्यांवर जाऊन लोकमतच्या प्रतिनिधीने चक्क गुटखा विकत घेतला. येथे खुलेआम गुटखा विक्री करताना पानटपरीधारक कॅमेराबध्द झाला. या ठिकांनी विविध कंपन्यांच्या गुटखा पुड्या विकत घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती मध्यवर्ती आगाराजवळ काही अंतरावर अन्न व प्रशासन विभागाचे विभागीय कार्यालय आहे. या ठिकाणी अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे, सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे बसतात. तरीही या परिसरात सहज गुटखा उपलब्ध होतो. ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा कोषागार कार्यालयासमोर पानटपरीवर प्रतिनिधींनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली असता येथेही सर्रास गुटखाविक्री होत आहे. अवैध गुटखा विक्रीकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने या व्यवसायातून गुटखा तस्कर गब्बर झाले आहेत. शहरात गुटख्याचे १०ते १५ मोठे व्यापारी आहेत. येथूनच संपूर्ण शहराला गुटख्याचा पुरवठा करण्यात येतो. शहरात सर्वत्र ८०० ते ९०० पानटपऱ्या आहेत. राज्यात गुटखाबंदी असतानाही कुठल्याही पानटपरीवर सहज गुटखा उपलब्ध होतो. पूर्वी कमी पैशांत मिळणाऱ्या गुटख्याचे दर गुटखाबंदीच्या काळात पानटपरी चालकांनी दुपटीने वाढविले आहेत. तरूणाई व्यसनाधिन होत चालली आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना गुटख्याचे व्यसन जडल्याने गुटख्याची विक्री अविरत सुरू आहे. सुंगधी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, विविध प्रकारच्या गुटख्यांच्या पुडया विकणे हा कायद्याने गुन्हा ठरविला आहे. मात्र, शासनाच्या गुटखाबंदीच्या आदेशांची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे आदेश पायदळी तुडविले जातात. लोकमतने रविवार व बुधवारी ‘स्टिंग आॅपरेशन’ करुन प्रत्येक पानटपरीवर गुटखा कसा उपलब्ध आहे, हे सचित्र उघडकीस आणले. त्यामुळे गुटखाविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र अन्न व प्रशासन विभाग कुंभकर्णी झोपेतच आहे. येथील अधिकाऱ्यांची जर कारवाई करण्याची मानसिकताच नसेल तर या विभागाच्या अधिकाऱ्यांचे काय काम? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सतत गुटखा खाल्याने कर्करोग होतो. ६० ते ७० टक्के तरुणपिढी व्यसनाधीन झाल्याचे, तज्ज्ञांचे मत आहे. यातून अनेक प्रकारच्या कॅन्सरची लागण होत आहे. परंतु बंदीनंतर दुपट्ट प्रमाणात गुटखाविक्री होत आहे. (प्रतिनिधी)
अमरावतीत खुलेआम गुटखा विक्री !
By admin | Published: May 09, 2016 12:08 AM