जनतेच्या आरोग्याशी खेळ : सणासुदीत हानीकारक केमिकल्सचा वापर होण्याची शक्यताअमरावती : ‘रघुवीर’च्या कचोरीत आढळलेल्या अळीमुळे ग्राहक संभ्रमात आहेत. नाश्त्याच्या पदार्थांसोबतच आता दुग्धजन्य पदार्थांच्या दर्जा आणि शुद्धपणाबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत. नाशवंत असणारे शीतकपाटात बंद असलेले नाशवंत दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ते किती दिवसांपासून फ्रिजरमध्ये आहेत, त्यांचा दर्जा कसा आहे, ते खाण्यायोग्य आहेत काय, याची शहानिशा ग्राहक करीत नसल्याने ग्राहकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रघुवीर प्रतिष्ठानात दुग्धजन्य पदार्थांचे दर शहरातील अन्य प्रतिष्ठानांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. तरीसुद्धा रघुवीरमधील दुग्धजन्य पदार्थांना सर्वाधिक मागणी असते. दुग्धजन्य पदार्थ नाशवंत असतात. २४ ते ४८ तासांच्या आत त्यांचा वापर करणे हितावह ठरते. या पदार्थांची विक्री करताना त्या पदार्थाच्या निर्मितीची तारीख आणि ‘एक्सापायरी डेट’ याचा स्पष्ट उल्लेख असायला हवा. मात्र, बहुतांश पदार्थांवर हा उल्लेख नसल्याने ग्राहक अंदाजेच हे पदार्थ दुकानदाराच्या विश्वासावर खरेदी करतात. आठवडाभराच्या आत जर दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असेल तर त्या पदार्थांवर निर्मिती आणि एक्सपायरीचा उल्लेख बंधनकारक नाही, असे एफडीएचा कायदा म्हणतो. मात्र, सात दिवसानंतरही या पदार्थांची विक्री करताना त्याबाबत ग्राहकांना कोणतीही सूचना दिली जात नाही. रघुवीरसह शहरातील अनेक प्रतिष्ठानात दुग्धजन्य पदार्थांची विक्री अशाच पद्धतीने केली जाते, हे वास्तव आहे. ग्राहकही डोळे मिटून हे दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतात. हे पदार्थ ताजे आहेत किंवा नाही, याची शहानिशा करण्याची उठाठेव ग्राहक क्वचितच करतात. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन ही बाब आरोग्यास हानिकारक ठरणारी आहे. रघुवीरसह विविध प्रतिष्ठानात शेकडो प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ विक्रीला ठेवले जातात. हे पदार्थ नासू नयेत, म्हणून शितकपाटात ठेवले जातात आणि ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची विक्री केली जाते. यातील सर्वच पदार्थाचा खप होतोच असे नाही. काही पदार्थ महिनोगिणती फ्रिजरमध्येच पडून असतात. महिनाभरानंतर एखाद्या ग्राहकाने मागणी केल्यास त्याच्या माथी तोच शिळा पदार्थ मारला जातोे. वास्तविक पदार्थ शिळा असल्याची सूचना ग्राहकांना देणे प्रतिष्ठानचालकाचे कर्तव्य आहे. मात्र, शहरात ही ग्राहकसहिष्णूता कुठेही पाहायला मिळत नाही. परिणामी ग्राहकांना अंदाजेच मिठाई, नाश्ता आणि इतर पदार्थ खरेदी करावे लागतात. तपासणीकडे एफडीएचेही दुर्लक्षशहरात दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारी अनेक प्रतिष्ठाने आहेत. मात्र, एखादी तक्रार आल्यानंतरच संबंधित प्रतिष्ठानातील खाद्यान्नाची तपासणी केली जाते. एफडीए अधिकारी स्वत: कुठल्याही खाद्यान्नाची तपासणी करीत नाहीत. एफडीएकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे कुठेकुठे तपासणी करावी, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. या पदार्थांची वेळेवेळी तपासणी होत नसल्यामुळे व्यापारीवर्ग पैशाच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाच्या खाद्यान्नांची सर्रास विक्री करीत आहे. हे ग्राहकांच्या आरोग्याला घातक ठरणारेआहे. पुढे सणासुदीचे दिवस आहेत. त्यापूर्वी तरी एफडीएने शहरातील प्रतिष्ठानांमध्ये खाद्यान्नाची तपासणी करावी.
‘एक्सपायरी डेट’शिवाय दुग्धजन्य पदार्थांची विक्री
By admin | Published: September 20, 2016 12:13 AM