अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट, विद्या परिषद व अभ्यास मंडळ सदस्य निवडीसाठी रविवारी सिनेट निवडणूक पार पडली. ६३ मतदान केंद्रांवर २०५ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत सील झाले असून मंगळवारी त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी ११ बुथ तयार करण्यात आले आहेत.
विद्यापीठअंतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांत पदवीधर मतदारसंघातून विजयासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा बघावयास मिळाली. प्राचार्य, पदवीधर, विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती येथील मतदान केंद्रावर प्रारंभी मतदारांना अव्यवस्थेचा सामना करावा लागला. मात्र, उमेदवारांच्या आक्षेपानंतर एकऐवजी दोन मतदान केंद्रांत मतदान प्रक्रिया पार पडली. अमरावती जिल्ह्यासाठी २० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. अंजनगाव सुर्जी येथे सकाळी मतदानासाठी तुरळक गर्दी होती. परंतु दुपारी २ वाजेनंतर मतदारांनी एकच गर्दी केल्याचे चित्र बघावयास मिळाले. अमरावती जिल्ह्यात २० केंद्रांवर १०३२४, अकोला सात केंद्रावर ४,५५२, बुलडाणा १३ केंद्रांवर १,५६२, यवतमाळ १५ मतदान केंद्रांवर ४,१८३ आणि वाशिम जिल्ह्यात आठ मतदान केंद्रांवर १,१९७ असे पाचही जिल्हे मिळून २१८१८ मतदार संख्या होती. विविध संवर्गातून २०५ उमेदवारांनी सिनेटमध्ये जाण्यासाठी प्रचारात आघाडी घेतली असली तरी मतदारांनी कुणाच्या बाजुने कौल दिला हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
प्रत्येक फेरीचा निकाल मोबाईल 'अॅप'वर -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभाग आणि गं्रथालयाच्या तळमजल्यावर मतमोजणीसाठी ११ बुथ तयार करण्यात आले आहेत. एलसीडी प्रोजेक्टरसह मोबाईल अॅपवर प्रत्येक फेरीचा निकाल उमेदवारांसह मतदारांना बघता येणार आहे. पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी ग्रंथालयात, तर अन्य मतदारसंघाची मतमोजणी ही वनस्पतीशास्त्र विभागात होणार आहे.
सिनेट मतमोजणीसाठी इत्थंभूत तयारी करण्यात आली आहे. पाचही जिल्ह्यांतून मतपेट्या पोहोचल्या असून मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होईल.- अजय देशमुख,निवडणूक निर्णय अधिकारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ