अमरावती : गर्दीचा फायदा घेऊन एटीएम खातेदारांची माहिती चोरून दिल्लीत बसलेल्या बॉसला पाठविण्याचे काम तो आरोपी करायचा. एटीएम क्लोनिंग प्रकरणात दिल्लीतून अटक केलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील एका आरोपीस रविवारी अमरावतीत आणले. या टोळी देशभरातील अनेकांची बॅक खातेधारकांची फसवणूक केली असून सद्यस्थितीत त्यांनी विदर्भ व मराठवाड्यातील बँक खातेदारांना 'टार्गेट' केले होते.अमरावती जिल्ह्यातील स्टेट बँकेतील खात्यातून परस्पर पैसे काढणारी आंतरराष्ट्रीय टोळी दिल्लीत बसून एटीएम क्लोनिंग करायचे. या टोळीतील परितोष तारापद पोतदार (३२,रा. शिखापल्ली, जि. मलकांगिरी, ह.मु.अमृतपुरी, नवी दिल्ली) याला अमरावती पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. विशाल उमरे (रा.चंद्रपूर) या आरोपीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. अमरावतीत आतापर्यंत २४ बँक खातेदारांच्या खात्यातून २२ लाखांपर्यंतची रक्कम चोरल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने सायबर सेलच्या तपासाअंती एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणात एकूण पाच आरोपी असून त्यापैकी परितोष पोतदार, विशाल उमरे व अन्य एक आरोपी हे मे २०१७ मध्ये अमरावतीत आले होते. विशालच्या बडनेरा येथील नातेवाईकांकडे ते थांबले होते. आठवडाभरानंतर ते चंद्रपूरला गेले आणि ११ सप्टेंबरला पुन्हा अमरावतीत आले. पाच दिवसांत त्यांनी विविध एटीएममध्ये जाऊन गर्दीचा लाभ घेत बँक खातेदारांचे एटीएम कार्ड क्रमांक व पिनकोड क्रमांक जाणून घेतले आणि ते तत्काळ मोबाईलच्या माध्यमातून दिल्लीत बसलेल्या बॉस बिसवासला पाठविले. तेथे बसलेल्या अन्य आरोपींनी एटीएम क्लोनिंग करून बँक खात्यातून पैसे विड्रॉल केले. दिल्ली, नोयडा, गुडगाव व हरियाणा येथील एटीएममधून ते पैसे काढण्यात आले.१० टक्के कमिशनवर चोरायचे माहितीअटक आरोपी एटीएमधारकांची माहिती चोरून ती दिल्लीतील बॉस बिसवासला पाठवायचे. प्रत्येक विड्रॉलवर ते १० टक्के कमिशन घेत होते. डाटा चोरलेल्या एटीएम कार्डमध्ये रक्कम नसेल, तर १ हजार रुपयाप्रमाणे प्रत्येक कार्डवर त्यांना पैसे मिळायचे.विशाखपट्टनम कारागृहात झाली ओळखओडीसा येथील एका फसवणूक प्रकरणात पाच आरोपी विशाखापट्टनम येथील कारागृहात बंद होते. दरम्यान गांजा प्रकरणात आरोपी विशाल उमरे कारागृहात होता. त्याठिकाणी एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपींची ओळख विशालसोबत झाली. पुढे कारागृहाबाहेर आरोपी आल्यानंतर विशालला एटीएम संबंधित गुन्ह्याची आॅफर आली होती. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील बँक खातेदारांची फसवणूक केली.अमरावती सायबर टीमचा सीपींकडून गौरवमागील दोन महिन्यांपासून अमरावतीची सायबर टीम एटीएम क्लोनिंग प्रकरणाच्या तपासासाठी परिश्रम घेत आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कान्होपात्रा बन्सा, राजेंद्र चाटे, पोलीस हवालदार प्रकाश जगताप, सुभाष पाटील, उमेश कापडे, संग्राम भोजने, सचिन भोयार, मयूर, महिला पोलीस स्वाती बाजारे, लोकेश्वरी, दीपिका कोसले तपासकार्यात गुंतले होते. त्यांनी गुडगाव, दिल्ली, हरियाणा, चंद्रपूर या ठिकाणी जाऊन चौकशी केल्यानंतर दिल्लीतून एका आरोपीस अटक केली. आरोपीवर १८ तास पाळत ठेवून त्यांनी हे यश मिळविले. त्याच्या कार्याचा गौरव पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केला.
बँक खात्यांची माहिती पाठवायचा दिल्लीतील 'बॉस'ला, देशभरातील अनेक एटीएमधारकांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 8:36 PM