अनंत बोबडे
येवदा (अमरावती) : दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे एसटी बसपुढे २१ वर्षीय युवकाने तलवार नाचवित एका मुलीला बाहेर पाठवा, मी तिला संपवतो, अशी धमकीच दिली. याप्रकरणी विद्यार्थ्यांना गावी सोडल्यानंतर चालक-वाहकाने बस येवदा पोलीस ठाण्यात लावली. येवदा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शस्त्र ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, महेश सकलकर (२१, रा. वरूड कुलट) असे आरोपीचे नाव आहे. येवदा येथे शिक्षणाकरिता अनेक विद्यार्थी दररोज येत असतात. १९जुलै रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पिंपळोद येथील विद्यार्थी एमएच ४० वाय ५०९९ क्रमांकाच्या येवदा-अकोला बसमध्ये बसले. ही बस थोड्या अंतरावर गेल्यानंतर महेशने या बसपुढे आपली दुचाकी लावली. सोबत आणलेल्या तलवारीने बसच्या दरवाजावर वार करीत बसमधील एका मुलीला बाहेर पाठवा, मी तिला संपवतो, असे म्हणाला.
सदर युवती १७ वर्षे वयाची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यादरम्यान मागून येत असलेल्या एका युवकाने प्रसंगावधान राखून महेशला बसपुढून बाजूला केले. त्यामुळे बस पुढे पिंपळोदला निघून गेली व विद्यार्थ्यांना सोडून चालकाने बस परत येवदा येथे आणून पोलीस ठाण्यात नेली व घटनाक्रम पोलिसांना माहिती दिली. यादरम्यान पीडित मुलगी व पालक पोलीस ठाण्यात दाखल झाले. पीडित मुलीची आपबिती ऐकताच येवदा पोलिसांनी तातडीने महेश सकलकरला अटक केली. त्याने लपवून ठेवलेली तलवार व दुचाकी ताब्यात घेतली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मुलीच्या तक्रारीवरून तातडीने दखल घेऊन आरोपीला अटक केली. त्याने लपवून ठेवलेली तलवारदेखील हस्तगत करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई सुरू आहे.- आशिष चेचरे, ठाणेदार, येवदा