पोलिसांची नजर चुकवून भ्रमंती : श्रीमंत अल्पवयीनांची शक्कलअमरावती : दुचाकी विकून वा विल्हेवाट लावून बक्कळ पैसा कमविण्यासाठी नव्हे तर केवळ क्षणिक मौजमस्तीसाठीच दुचाकी चोरीची मालिका त्या अल्पवयीन मुलांनी घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतलेल्या सात विद्यार्थ्यांकडून सहा दुचाकी जप्त करण्यात शहर कोतवाली पोलिसांना यश आले. शहरातील गजबजलेल्या चौकातून बनावट किल्लीने दुचाकी चोरल्यानंतर ही अल्पवयीन मुले पोलिसांची नजर चुकवून शाळा संपल्यानंतर शहरभर भ्रमंती करीत असल्याचे उघड झाले आहे. घरून सायकलने अंबापेठ येथील शाळेत यायचे. दिवसभर शाळा करायची आणि दोन-तीन दिवसांच्या खंडानंतर दुचाकी चोरायची, असा त्यांचा दिनक्रम होता. केवळ मौजमस्ती आणि वेगवेगळी वाहने फिरविण्याच्या हौसेपोटी या श्रीमंत कुटंूबातील अल्पवयीन विद्यार्थ्यांनी दुचाकी चोरीची शक्कल लढविल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा महिन्यांपासून शहरात सुरु असलेले दुचाकी चोरीचे सत्र पाहता या विद्यार्थ्यांकडून आणखी काही गुन्ह्यांची कबुली मिळेल, अशी शक्यता तपास अधिकारी एपीआय सुमित परतेकी यांनी व्यक्त केली. दुचाकी चोरीचा ‘सिलसिला’२५ डिसेंबर रोजी अल्पवयीन विद्यार्थी पंचशिल टॉकीज मार्गावरील गुलशन प्लाझा या व्यावसायिक संकुलाजवळ उभे असताना त्यांना एका किल्ली असलेली दुचाकी दिसून आली. कुणाचेही लक्ष नसल्याची खात्री केल्यानंतर त्यापैकी एकाने धाडस करून ती दुचाकी तेथून चोरली. त्या दुचाकीचा क्रमांक खोडून शहरात भ्रमंती सुरु केली. तेव्हापासून दुचाकी चोरीचा ‘सिलसिला’ सुरु झाला. आपला मित्र चोरीची दुचाकी फिरवत असल्याचे पाहून अन्य काही विद्यार्थी त्याच मार्गावर वळले व त्यानंतर बनावट किल्लीच्या आधारे मागील २० दिवसांत त्यांनी सहा दुचाकी लंपास केल्या. सात अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही वाहने जप्त केली आहेत. नोटीस बजावून मुलांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आले. आवश्यक वाटल्यास त्यांना चौकशीकरिता पुन्हा बोलविण्यात येईल. - ज्ञानेश्वर कडू , पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे.
मौजमस्तीसाठीच दुचाकी चोरीची मालिका
By admin | Published: January 20, 2016 12:24 AM