यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, तोही ऐन तीळ सवंगणीच्या वेळेत सतत हजेरी लावल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शेतकऱ्यांनी तर तीळ पिकाची सवंगणीदेखील केली नाही. त्यामुळे यंदा बाजारपेठेत तीळाची आवक कमालीची घटली आहे. तसेच साखरेचे भाव वधारल्याने व दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे घटक बनलेल्या साखरेला अधिक मागणी असल्याने गुळाचे उत्पादन कमी करण्यात आल्याचा परिणाम सध्याच्या मागणीवर दिसून येत आहे. संक्रातीला गुळाचा वापर वान वाटपात अधिक प्रमामात होत असल्याने प्रत्येक गृहिणी तीळ-गुळाची खरेदी करताना दिसत आहे. त्यातच कोरोनाने शिरकाव केल्याने वाहतूक खर्चाचा भार वाढल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा तीळ, साखर व गुळाकरिता अधिक किंमत मोजावी लागत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
बॉक्स
तीळाचे दर १३५ रुपये प्रतिकिलो
तीळाचे पीक विशेषत: गुजरात आणि मध्यप्रदेशात अधिक प्रमाणात होते. महाराष्ट्रात काहीच भागात तीळाचे उत्पादन घेण्यात येते, मात्र ते घरगुती वापरापुरतेच उत्पादन होत असल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता गुजरात व मध्यप्रदेशातून तीळाची आयात केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत २ ते ५ रुपये अधिक दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गुळाचे भाव ५० रुपये प्रतिकिलो
सध्या साखरेचा सर्रास वापर होत असल्याने गुळाची मागणी कमी झाली होती. मात्र, १० वर्षांपासून मधुमेहाच्या आजारात वाढ झाल्याने अनेकांनी साखरेचा चहा व साखरेपासून बनविलेल्या खाद्यपदार्थांकडे नाईलाजाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पर्याय म्हणून विना केमिकलचा गूळ मधुमेहींकरिता उपयोगी ठरल्याने बहुतांश घरांत गुळाचा वापर व्हायला लागला. त्यामुळे संक्रांतीत वाढत्या मागणीनुसार गुळाचे दर मागील वर्षी ४० रुपये, तर यंदा ५० रुपयांवर पोहचले आहे.
साखरेला मागणी अधिक म्हणून भावात तेजी
साखरेचा प्रत्येक घरात प्रत्येक गोडधोड बनविताना वापर केला जात असल्याने मागणी अधिक आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ३८ रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ दुकानांत ४० ते ४२ रुपये दर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत साखरदेखील ५-७ रुपयांनी वधारलेली असल्याचे किराणा व्यापारी सतीश पटेल यांनी सांगितले.
कोट
गत वर्षीच्या तुलनेत भाव स्थिर असले तरी कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावल्याने पाहिजे तरी मागणी नाही. १० किलो घेणारा ग्राहक ५ किलोच नेत असल्याने जीवनावश्यक जरी असले तरी बजेटअभावी खरेदीत ग्राहक हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे.
- मंगेश निशाण,
व्यापारी, ओम किराणा स्टोअर्स
--
यंदा कोरोनाच्या संकटाने हातघाईस आलो. कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा रोजगार हिरावल्याने पैशाची आवक कमी व त्यातच महागाई वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत तीळसंक्रांतीचे वान वाटपात हात आखडता घेणार आहे. खरेदीदेखील कमीच करावी लागेल.
- पल्लवी देखमुख, गृहिणी, अर्जूननगर