अमरावती : सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेतील प्रशासनाबाबत तसेच कायद्याच्या अधीन राहून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबाबत सर्व अधिकारी वर्ग यांना धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अमरावती व सार्वजनिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विभागातील धर्मादाय कार्यालयाच्या सर्व न्यायिक अधिकाऱ्यांची शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यशाळेस राज्यातील सर्व न्यायिक अधिकारी आभासी पद्धतीने तसेच अमरावती विभागातील सर्व न्यायिक अधिकारी कार्यक्रमास प्रत्यक्ष हजर होते. कार्यक्रमाकरिता धर्मादाय सहआयुक्त केदार जोशी यांनी प्रकरणात संलग्नित पुरावे कसे घ्यायचे याबाबत भारतीय पुरावा कायद्याचे सोप्या शब्दात सर्व न्यायिक अधिकारी व सर्व वकील मंडळी यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाकरिता आभासी पद्धतीने नाशिक कार्यालयातील धर्मादाय सह आयुक्त झपाटे यांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील कलम २२ मधील बाबी साध्या सरळ पद्धतीने समजून सांगितल्या. तसेच या कार्यशाळेला सार्वजनिक वकील संघाचे अध्यक्ष बोथरा यांनी त्यांच्या अनुभवाशी निगडित व कायद्याशी संलग्नित बाबीवर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे धर्मादाय उपायुक्त अकोला सोनुणे, सहायक धर्मादाय आयुक्त अमरावती गाडे या कार्यक्रमास वक्ते म्हणून लाभले. या कामाचे सर्व सूत्रसंचालन इंगळे यांनी केले व या कार्यक्रमाची आभाररुपी सांगता सार्वजनिक वकील संघाचे सचिव सतीश पाटील यांनी केली.