अमरावती : महाविद्यालयीन प्राध्यापकांनी ४ फेब्रुवारी ते १० मे २०१३ या कालावधीत पुकारलेल्या संपकाळातील ७१ दिवसांंच्या वेतन कपातीबाबत येत्या १४ आॅगस्ट रोजी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे या विषयावर तोडगा काढतील, असे पत्र विधानपरिषद सभापतींचे सचिव म. मु. काजे यांनी प्रसृत केले आहे.एमफुक्टोच्या झेंड्याखाली प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ७१ दिवसांचा संप पुकारला होता. राज्य शासनाने प्राध्यापकांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, शासनाने ७१ दिवसांच्या संपकाळातील वेतन कपात केली. ही बाब अन्यायकारक असल्याचे गाºहाणे संपकरी प्राध्यापकांनी शासनदरबारी मांडले होते.गत सहा वर्षांपासून वेतन कपातीची रक्कम परत मिळण्याची मागणी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना क्रमांक ३६३ नुसार मांडून चर्चेत आणली. प्राध्यापकांनी हक्कासाठी लढा दिला. त्यांचे अवाजवी कपात करण्यात आलेले ७१ दिवसांचे वेतन परत मिळावे, अशी मागणी देशपांडे यांनी केली. त्यानुसार मंत्रालयात १४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला ना. विनोद तावडे यांच्यासह आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, किशोर दरांडे, विक्रम काळे, ना.गो. गाणार, नुटाचे चेअरमन प्रवीण रघुवंशी, प्राचार्य आर.डी. सिकची, एन.एन. गवांडे, उच्च व तंत्र शिक्षण सचिव आदींचा समावेश राहणार आहे.
प्राध्यापकांच्या संपकाळातील ७१ दिवसांच्या वेतनावर तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 8:41 PM