परतवाडा : शहरातील घामोडीया प्लॉटनिवासी सात दिवसांच्या मुलीला कोरोनाने ग्रासले आहे. तिची ॲन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने अमरावती येथे औषधोपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, या मुलीच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांचीच लागण या सात दिवसांच्या बाळाला झाल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे. एवढ्या लहान बाळाला कोरोनाने ग्रासण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कायार्लयाकडील माहितीत या सात दिवसांच्या बाळाचा उल्लेख आहे.
यातच अचलपुरातील तिघे कोरोना संक्रमित निघाले आहेत. आरटीपीसीआर टेस्ट अंतर्गत अचलपुरातील ५२ वर्षीय व ३१ वर्षीय महिला आणि ३० वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
अचलूपर, परतवाड्यासह ग्रामीण क्षेत्रात काेरोना संक्रमित आढळून येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्धी केल्या जाणाऱ्या माहिती दररोज तालुक्यात कोरोना रुग्ण नोंदले जात आहेत.
बॉक्स
नियमांची पायमल्ली
कोरोनाच्या अनुषंगाने पाळावयाच्या नियमावलीकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. मास्क लावणाऱ्यांची आणि सामाजिक अंतर ठेवणाऱ्यांची संख्या एकदम रोडावली आहे. कार्यप्रसंगी आणि बाजारात, लग्नसमारंभात गर्दी वाढली आहे. एकाच ठिकाणी दीडशे दोनशेपासून सातशे-आठशेपर्यंत लोक एकत्र येत आहेत. नवरदेव नवरीसह वऱ्हाडीही मास्क विसरले आहेत. कोरोना नाहीच यावर परिसंवाद घडवून आणत आहेत. मंगल कार्यालयाचे संचालकही कोरोना नियमावली विसरल्याचे दिसून येत आहेत.