अमरावती : शहरातील पठाण चौकस्थित झेंडा चौकात देशी कट्टयासह जिवंत राउंडची खुलेआम विक्री करताना तरुणास अटक केली असून, त्याच्याजवळून सहा जिवंत राउंडसह चार देशी कट्टे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले. रहेमानखान अयुबखान (19, पठाणपुरा, अमरावती), असे आरोपीचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेचा भंग करणाऱ्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव, सहा पोलीस आयुक्त डाखोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वाखाली दुर्गोत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन पथके नेमून निगराणी ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, शनिवारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यामध्ये एक गावठी देशी कट्टा, एक जिवंत काडतुस (किंमत 25,500 रुपये) नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केले. आरोपी रहेमानखान अयुबखान याच्याविरुद्ध 312/2019 कलम 3,7,25 आर्म अँक्टनुसार सहकलम 135 महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविले आहे. तसेच आरोपी रहेमानखान याच्याकडून दोन देशी कट्टे, चार जिवंत राउंड असा 52000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, शोएब परवेज अब्दूल जमील (30, जाकीर काँलनीतील) याला अटक करून एक देशी गावठी कट्टा आणि एक जिवंत राउंड असा 25500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर गुन्ह्यात सात दशी कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईत पोउनि राम गिते, विकास रायबोले सह आदी कर्मचारी सहभागी होते.