लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथून आठ कि.मी. अंतरावरील अप्पर वर्धा धरणाची सात दारे १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उघडण्यात आली आहेत. अप्पर वर्धा धरण सध्या १०० टक्के भरलेले असून, या धरणाचे १३ पैकी सात दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले आहेत. यातून ११४ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांनी धरण परिसरात मोठी गर्दी केली आहे. आतादेखील धरणाच्या मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्याने अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे कधीही उघडू शकतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे अप्पर अर्धा धरणात केवळ ११ टक्के जलसाठा शिल्लक राहिला होता. मागील दोन ते तीन वर्षांपासून मोर्शी तालुक्यात अत्यल्प पाऊस कोसळल्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली होती. यावर्षी उशिरा का होईना, पावसाने जोरदार हजेरी लावली व अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात झपाट्याने वाढ होत गेली. धरणाची निर्धारित क्षमता ३४२.५० मीटर असून, तेथपर्यंत पाणी काठोकाठ भरले आहे. धरणाचा सध्याचा उपयुक्त जलसाठा ५६४.०५ दलघमी इतका आहे.
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची सात दारे उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:57 AM