अमरावती : जिल्ह्यात ५० वर्षांचा आढावा घेता, मान्सूनच्या आगमनात वैविध्य आढळून आले आहे. यंदा १० जूनला आलेला मान्सून तसा लवकरच आला आहे. ५० वर्षांत सात वेळा मान्सूनचे आगमन लवकर झाले. सर्वाधिक लवकर सन १९९० मध्ये ५ जूनला मान्सून दाखल झाल्याची हवामान विभागाची माहिती आहे.
जिल्ह्यात किमान ८० टक्के जिरायती क्षेत्र मान्सूनवर विसंबून आहे. पाऊस वेळेवर आल्यास खरिपाची पेरणी वेळेवर होते व उशीर झाल्यास अल्पावधीतील मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांना फटका बसतो. याशिवाय दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावते. कधी या पिकांऐवजी कपाशी, तुरीचा पेरा वाढतो. उशिराच्या मान्सूनमुळे बरेचवेळा शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न खालावल्याचे दिसून येते.
यंदा हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, सरासरीइतका पाऊस अपेक्षित आहे. प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती तयार झाल्याचा फायदा मान्सूनला मिळाला व अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचे भाकीत या विभागाद्वारे दोन आठवड्यांपूर्वी केले होते. यंदा हवामान विभागाचा हा अंदाज यंदा खरा ठरला असला तरी पावसाळ्याची अद्याप साडेतीन महिने बाकी आहेत.
जिल्ह्यात १३ ते १५ जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल, अशी अपेक्षा हवामनतज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, त्याच्या तीन दिवसांपूर्वी मान्सूनचे आगमन जिल्ह्यात झाले. मृग नक्षत्राच्या तिसऱ्याच दिवशी जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली असली तरी दोन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने पेरणीची लगबग थबकली आहे.
पाईंटर
मान्सून लवकर येणारे वर्ष
सन १९८० : ०७ जून
सन १९९० : ०५ जून
सन १९९१ : १० जून
सन २००० : ०६ जून
सन २०१८ : ०९ जून
सन २०२१ : १० जून
बॉक्स
२००२ मध्ये २७ जुलैला आगमन
जिल्ह्यात ५० वर्षांत तब्बल ११ वेळा मान्सून लेटलतीफ ठरला आहे. सन २००२ मध्ये २७ जुलैला दाखल मान्सूनचा सर्वाधिक उशीर ठरला. याशिवाय १९८२ मध्ये २० जुलै, १९८३ मध्ये १२ जुलै व १९८४ मध्ये १ जुलै, १९९६ मध्ये ९ जुलै, २००३ मध्ये २५ जुलै, २००४ मध्ये २० जुलै, २०१० मध्ये ७ जुलै व २०१४ मध्ये ११ जुलै रोजी मान्सूनचे आगमन झाले.
बॉक्स
पाच वर्षांत ९ ते २२ जून दरम्यान आगमन
जिल्ह्यात मागील पाच वर्षांचा आढावा घेता, मान्सूनचे आगमन ९ ते २२ जून दरम्यान झाले आहे. यामध्ये २०१५ ला १४ जून, २०१६ ला १८ जून, २०१७ मध्ये १४ जून, २०१८ मध्ये ९ जून, २०१९ मध्ये २२ जून, २०२० मध्ये १२ जून २०२१ मध्ये १० जून रोजी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, नंतर पावसात सातत्य राहिलेले नाही.
बॉक्स
जिल्ह्यात सरासरी ११२ मिमी पाऊस
जिल्ह्यात ७५० मिमी पाऊस अपेक्षित असतो, त्याच्या तुलनेत जिल्ह्यात सद्यस्थितीत ११२.६ मिमी पाऊस कोसळला. सरासरीच्या १६३ टक्के हा पाऊस आहे. गतवर्षी आजच्या तारखेला ८७.७ मिमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात आजमितीस ६८.९ मिमी पावसाची अपेक्षा असते. सध्या वरूड, धारणी व मोर्शी तालुके पावसात माघारले असल्याचे दिसून येते.