अमरावती : येथील राजापेठ रेल्वे उड्डाणपुलावर शुक्रवारी चार गर्डर क्रेनच्या सहाय्याने चढविण्यात आले. यावेळी सात तासांचा मेगाब्लॉक होता. लोकल ट्रेन रद्द तर अमरावती-नागपूर पॅसेंजर बडनेरा रेल्वे स्थानकाहून सोडण्यात आली. आता उर्वरित चार गर्डर चढविण्याचे काम मंगळवारी केले जाणार आहे.यापूर्वी राजापेठ रेल्वे उड्डाणपुलावर गर्डर टाकण्यासाठी ३० जुलै ते २ आॅगस्टदरम्यान मेगाब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सततच्या पावसाने पुलावर गर्डर चढविण्याचे काम रखडले. परिणामी शुक्रवारी हे काम सुरू झाले. पहिल्या टप्प्यात क्रेनच्या साह्याने चार गर्डर चढविण्यात रेल्वेला यश आले. हे भव्य काम बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भुसावळ, बडनेरा आणि अमरावती येथील रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता. नागरिकांसाठी ये-जा करण्याचा हा मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला. या भागात सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान कार्यरत होते. या कामासाठी दोन मोठ्या क्रेन, तीन पोकलँड आणि दोन लहान क्रेन मागविल्या आहेत. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगच्या परिसरात पावसामुळे चिलख झाला असताना दगड आणि मुरूम टाकू न हा भाग वजनदार वाहनांसाठी सज्ज करण्यात आला. त्यामुळे ३५० टन क्षमतेचे वजन उचलणारी क्रेन काम करू शकली, हे विशेष. भुसावळ येथून बी. रावसाहेब, रेल्वे पूल बांधकाम तज्ज्ञ पामीरकुमार, आयडब्ल्यू एम.पी. पाटील, एस.एस. येनकर, पी.डी. हिवरकर, एस.एम. पांडे, अभियंता लोहकरे आदी रेल्वे अधिकाऱ्यांची चमू गर्डर चढविण्याच्या कामी कार्यरत आहेत. येत्या मंगळवारी पुन्हा सात तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.एका गर्डरचे वजन २२ टनराजापेठ रेल्वे उड्डाणपुलावर आठ गर्डर चढविले जाणार आहेत. शुक्रवारी चार गर्डर चढविण्यात आले. चार गर्डर मंगळवारी चढविले जातील. प्रत्येकी २२ टनाच्या या आठ गर्डरने पूल जोडला जाईल. नागपूर येथून ट्रकद्वारे गर्डरचे सुटे भाग आणले आहेत.१० ते ५ रेल्वे गाड्या बंदराजापेठ रेल्वे फाटक परिसरात भव्यदिव्य उड्डाणपूल साकारला जात आहे. येत्या मंगळवारी अमरावती- बडनेरा दरम्यान सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सात तासांचा मेगाब्लॉक राहील. दरम्यान गाड्या बंद राहतील, असे स्टेशन प्रबंधकांनी सांगितले.
सात तासांचा मेगाब्लॉक ; रेल्वे उड्डाणपुलावर चार गर्डर चढविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 1:06 AM